बडोदा बँकेचे एटीएम पळविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 31, 2014 23:36 IST2014-08-31T23:26:25+5:302014-08-31T23:36:28+5:30
नागाव फाटा येथील घटना : चौघा चोरट्यांचे कृत्य; पोलिसांबरोबर झटापट

बडोदा बँकेचे एटीएम पळविण्याचा प्रयत्न
शिरोली : नागाव फाटा (ता. हातकणंगले) येथील बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम मशीन चौघा चोरट्यांनी पळवण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न फसला आणि एटीएममधील सुमारे २० लाख रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली. ही घटना आज, रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.
बॅँक आॅफ बडोदाची पुणे-बंगलोर महामार्गालगतच नागाव फाटा येथे शाखा आहे. या शाखेशेजारीच खवरे कॉम्प्लेक्समध्ये एटीएम सेंटर आहे. या एटीएमला सुरक्षारक्षक नाही, हे पाहून चार चोरट्यांनी सुरुवातीस एटीएम गॅसकटरने जाळून फोडण्याचा प्रयत्न केला.
परंतु, एटीएम फुटत नसल्यामुळे पूर्ण मशीनच बरोबर आणलेल्या टेम्पोत भरण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी शिरोली पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाला एटीएम सेंटर उघडे दिसल्यामुळे सहायक फौजदार प्रकाश पाटील व पोलीस नाईक सुहास पाटील एटीएम सेंटर पाहण्यासाठी गेले असता चार चोरटे खवरे कॉम्प्लेक्समधून सुमारे २० फूट अंतरावरून ओढत आणलेले एटीएम मशीन सोबत आणलेल्या टेम्पोत चढवीत होते.
यावेळी पोलिसांना पाहून पळून जाताना चोरट्यांची प्रकाश पाटील, सुहास पाटील यांच्याबरोबर झटापट झाली. मात्र, याचवेळी टेम्पोचालकाने टेम्पो सुरू केल्याने ते चारही चोरटे आंबेडकर नगरमधून नागावच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर शिरोली पोलिसांनी संपूर्ण नागाव पिंजून काढले; पण चोरटे सापडले नाहीत. सकाळी एटीएम मशीनवरील व घटनास्थळावरील ठसे घेण्यासाठी ठसेतज्ज्ञांचे पथक बोलावले होते.
बँक अधिकाऱ्यांनी एटीएममधील रक्कम मोजली असता त्यामध्ये १९ लाख ७६ हजार इतकी रक्कम होती. गेल्या सहा महिन्यांत दोनवेळा बँक आॅफ बडोदाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे; तरीही बॅँकेने सुरक्षेसाठी रक्षक ठेवलेला नाही. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
चौघे चोरटे कोल्हापूरचे..
एटीएम मशीन फोडण्यासाठी चौघेजण पांढऱ्या रंगाच्या कोल्हापूर पासिंगच्या ४०७ टेम्पोतून आले होते, असे घटनास्थळावरून व पोलिसांनी सांगितले. म्हणजे चोरटे हे कोल्हापूर जिल्ह्यातीलच असण्याची शक्यता आहे. टेम्पोचा नंबर सापडला असल्यामुळे चोरटे लवकरच सापडतील, असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक के. पी. यादव यांनी व्यक्त केला.