कल्याणकारी मंडळ स्थापन्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: May 13, 2016 00:58 IST2016-05-13T00:29:49+5:302016-05-13T00:58:43+5:30
राजेश क्षीरसागर : ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त कार्यक्रम; इंद्रधनुष्य स्मरणिकेचे प्रकाशन

कल्याणकारी मंडळ स्थापन्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर : परिचारिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, निवृत्तिवेतन, आदी मागण्यांसाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.
महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनतर्फे गुरुवारी ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘सीपीआर’चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपमहापौर शमा मुल्ला, असोसिएशनच्या अध्यक्षा हशमत हावेरी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ए. ए. चौगुले, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक
डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. रूपेश शिंदे, आदी उपस्थित होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात खासगी रुग्णालये, ग्रामीण भागातील परिचारिकांना संघटित करून संघटना बांधावी. या सर्वांना एकत्र करून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या तर त्यावर लवकर कार्यवाही करता येईल.
यानंतर जुन्या-नव्या अशा विविध सुरेल गाण्यांचा ‘गीत गाता चल’ हा सदाबहार कार्यक्रम झाला. दरम्यान, असोसिएशनच्या ‘इंद्रधनुष्य’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आशा आडसुळे यांनी प्रतिज्ञापठण केले. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्याबद्दल वर्षा पोवार यांनी माहिती सांगितली. जयराम चव्हाण यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या घोषवाक्याबाबत माहिती दिली.
एस. एस. पुजारी यांनी सूत्रसंचालन, संघटना सचिव श्रीमंती पाटील यांनी प्रास्ताविक, तर अविनाश कांबळे यांनी आभार मानले.
'लोकमत'च्या जलमित्र अभियानाच्या पोस्टरचे अनावरण
रुग्णसेवेसाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या परिचारिकांना ‘जागतिक परिचारिका दिना’बद्दल ‘लोकमत’तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ‘लोकमत’च्या पाणी बचतीसाठी सुरू असलेल्या ‘जलमित्र अभियाना’च्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.