पेयजलमधील अपहार दडपण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 27, 2014 00:14 IST2014-11-27T00:08:35+5:302014-11-27T00:14:51+5:30
आमजाई व्हरवडेतील योजना : अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

पेयजलमधील अपहार दडपण्याचा प्रयत्न
आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेतील घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला असून, काल १३ लाख ५० हजार ज्या अज्ञाताने ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर भरले होते, त्याचा आज, बुधवारी शोध लागला. संजय शंकर जाधव या नावे बँक आॅफ इंडिया, कोल्हापूर शाहूपुरी शाखेतून ही रक्कम वर्ग झाल्याचे आज उघड झाले आहे.
जाधव यांना ग्रामपंचायतीने २४ जून १४ रोजी धनादेश दिलाच कसा व जाधव याने ही रक्कम तातडीने वर्ग केलीच कशी, याचे गौडबंगाल काय? या सर्व प्रकरणात ग्रामसेवकापासून संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबधितांचे धाबे दणाणले आहेत. कालपासून हे प्रकरण दाबण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.
आमजाई व्हरवडे येथील ४९ लाखांच्या पेयजल योजनेतील काम निकृष्ट व अर्धवट आहे. याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने हे प्रकरण बाहेर आले.
या पेयजलचे बिल अदा करताना ग्रामसभा न घेता, तसेच कामाची पूर्तता झालेली नसताना मुख्य ठेकेदाराला बाजूला ठेवूनच ग्रामसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने संजय जाधव यांच्या नावे धनादेश दिला. मात्र, कोेणत्याही कामाची रक्कम देताना मुख्य ठेकेदाराच्या नावे धनादेश देऊन रक्कम दिली जाते. मात्र, साडेतेरा लाखांचा अपहार करण्याच्या उद्देशानेच जाधव यांच्या नावे धनादेश दिल्याचे आता उघड झाले आहे.
पेयजलचा पूर्ण रकमेचा धनादेश देताना कामाचा दर्जा व काम पूर्ण झाल्याचे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे जरूरीचे असते. मात्र, तसे न करता धनादेश दिल्याने शासकीय अधिकाऱ्यांचाही हात आहे काय? हे आता तपासणे गरजेचे आहे.
दरम्यान, या १३ लाख ५० हजार रुपयांच्या घोटाळ्यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी पेयजलचे अध्यक्ष व सचिव यांना जबाबदार धरले आहे. त्यांनीच हा धनादेश जाधव यांना दिल्याचा आरोप केला आहे, तर पेयजलचे सचिव व अध्यक्ष यांनी या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसून, आमच्या बोगस सह्या मारल्याचा आरोप केला. कारण याची सर्व कागदपत्रे ग्रामसेवकांच्या ताब्यात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
अविनाश सुभेदारांनी स्वत: लक्ष घालावे
५० लाखांच्या कामात १३ लाखांचा अपहार उघडकीस आला आहे. जर हे प्रकरण दाबले गेले, तर जिल्ह्यात चुकीचा संदेश पोहोचण्यास वेळ लागणार नाही. प्रकरण दाबले गेले, तर भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा अर्थ होईल. त्यामुळे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारवाई एवढी मोठी करा की, जिल्ह्यात पुन्हा शासकीय कामात भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.