जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 11, 2014 00:22 IST2014-09-11T00:17:44+5:302014-09-11T00:22:48+5:30
मोर्चावेळी वाहनांची तोडफोड : सनी पोवार मृत्यूप्रकरणी फरार आरोपींच्या अटकेची बहुजन अन्याय निवारण समितीची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : पेठवडगाव येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यूप्रकरणातील फरार संशयित आरोपी साहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व पोलीस नाईक धनाजी पाटील यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ बहुजन अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने आज, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अडविल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवारातील काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने संशयित आरोपींना चोवीस तासांच्या आता अटक करा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना दिले.
एस. टी. बसच्या काचा फोडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २३ आॅगस्टला वडगाव पोलिसांनी संशयित आरोपी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या अचानक पोटात दुखू लागल्याने सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोवार याच्या मृत्यूचे पडसाद वडगावसह कोल्हापुरात उमटले. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचा थोरला भाऊ जयदीप पोवार याने वडगाव पोलिसांत दिली. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, हवालदार बनन शिंदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा (३०२) दाखल करण्यात आला तसेच या प्रकरणाचा गोपनीय तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सी. आय.डी) विभागाकडे देण्यात आला. घटना घडून १८ दिवस उलटले तरी संशयित आरोपींना अटक होत नाही, त्याच्या निषेधार्थ आज बहुजन अन्याय निवारण कृती समितीच्या सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची तीव्रता पाहून पोलिसांची फौजच तैनात करण्यात आली होती.
बिंदू चौकातून मोर्चास सुरुवात झाली. शिवाजी चौक, सीपीआर, दसरा चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन मोर्चा धडकला. मोर्चामध्ये महिला व तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता. पोलिसांनी प्रवेशद्वारासमोर अडविल्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेतेमंडळींनी मोर्चाला गालबोट लावू नका, असे आवाहन केल्याने कार्यकर्ते पुढे जायचे थांबले. यावेळी त्यांनी परिसरात लावलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या नंबरप्लेट फोडल्या तर शासकीय फलक फाडले. त्यानंतर काही मोजक्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर बोलाविले. त्यानंतर जिल्हाधिकारी माने, निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे आंदोलकांसमोर आले. अन्याय निवारण समितीचे निमंत्रक एल. जी. सनदी यांनी संशयित आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक झाली पाहिजे. त्यांची नार्को स्टेट करावी, खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. मृत सनी याचा भाऊ जयदीप याला सरकारी सेवेत घ्यावे, तसेच कुटुंबीयांना एक कोटींची नुकसानभरपाई द्यावी, वडगाव येथे सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्यांचे निवेदन दिले.
माने यांनी फरार संशयित आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करू, मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. त्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. मोर्चात प्रा. विश्वास देशमुख, जगन कराडे, वैभव कांबळे, दिलीप वायदंडे, नंदकुमार गोंधळी, लाला नाईक, प्रतापराव मधाळे, सचिन जाधव, पी. एस. चोपडे, सुभाष देसाई, दिगंबर संकट, सुभाष माने, अविनाश अंबपकर सहभागी झाले. (प्रतिनिधी)