मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: May 23, 2015 00:27 IST2015-05-22T23:41:29+5:302015-05-23T00:27:25+5:30

पानसरे हत्या प्रकरण : भाकप कार्यकर्त्यांचा गनिमी कावा

Attempt to counter the flag of Chief Minister | मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना पकडण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचा निषेध करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गनिमी काव्याने केलेले आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले.
या आंदोलनासाठी भाकप कार्यकर्त्यांनी पाच पथके केली होती. विमानतळ रोड, शांतिनिकेतन, टेंबलाईवाडी बीएसएनएल चौक, हॉटेल ओपल आणि ताराराणी चौक येथे मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी या पथकांच्या माध्यम
ातून कार्यकर्ते थांबून होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास टेंबलाईवाडी बीएसएनएल चौक परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांचा गाड्यांचा ताफा येताच त्याला अडविण्यासाठी भाकप कार्यकर्ते रस्त्यावर धावले. त्यांनी ‘दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना अटक झाली पाहिजे’, ‘मुख्यमंत्री चले जाव’ अशा घोषणा देत निषेध सुरू केला. त्यातील रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, दिलावर मुजावर, महावीर आवटे, भगवान यादव, रमेश वडणगेकर, उमेश सूर्यवंशी या कार्यकर्त्यांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
त्यांची धरपकड करून पोलिसांनी ताफा जाण्यासाठीचा मार्ग मोकळा केला. आंदोलनात प्रा. विलास रणसुभे, दिलीप पोवार, अनिल चव्हाण, शिवाजी शिंदे, चंद्रकांत खाडे, नामदेव गावडे, प्रकाश ठाकूर, बी. एल. बर्गे, सुशीला यादव, सुभाष वाणी, रघुनाथ देशिंगे, आदी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. (प्रतिनिधी)


महिला कार्यकर्त्यांना क्रूर वागणूक
आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांना बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांनी क्रूर वागणूक दिली. यातील सीमा पाटील आणि निवृत्त प्राध्यापिका आणि वयस्कर आशा कुकडे यांची महिला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने धरपकड केली. यात पाटील यांच्या दंडावर वळ उठले. महिला पोलिसांच्या या वागणुकीचा आम्ही निषेध केल्याचे श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे यांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांचा निषेध
डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुन्यांचा शोध राज्य सरकारला अद्यापही घेता आलेला नाही. हे खुनी शोधून न काढण्याचे धोरण सरकारने स्वीकारल्याचे दिसून येते. त्याच्या निषेधार्थ आम्ही मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला. शिवाय त्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन केले.
- रघुनाथ कांबळे, शहर सचिव, भाकप


कोल्हापुरात भाजपच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल निषेध केला. त्यांची पोलीसांनी अशी धरपकड केली.

Web Title: Attempt to counter the flag of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.