हल्लेखोर आठवत नाहीत

By Admin | Updated: March 15, 2015 00:50 IST2015-03-15T00:25:35+5:302015-03-15T00:50:41+5:30

उमा पानसरे यांची मुलाखत : गोविंद पानसरे यांचे काम पुढे सुरूच ठेवणार

The attacker can not remember | हल्लेखोर आठवत नाहीत

हल्लेखोर आठवत नाहीत

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांसंंबंधी नेमकेपणाने माहिती या प्रकरणातील एकमेव साक्षीदार व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांना आठवत नसल्यामुळे मारेकऱ्यांचा नेमका सुगावा स्पष्ट झाला नाही. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी शनिवारी उमा यांची मुलाखत घेतली. संपूर्ण मुलाखतीमध्ये त्या मारेकऱ्यांसंंबंधी प्रश्न विचारल्यानंतर काही वेळ बोलायच्या थांबत होत्या. मात्र, त्यांनी मोठ्या धीराने आणि आत्मविश्वासाने अ‍ॅड. पानसरे यांचे काम पुढे सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
१६ फेब्रुवारी रोजी पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेले अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. पत्नी उमा रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या आहेत. त्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी पहिल्यांदाच बोलल्या. त्या म्हणाल्या, त्या दिवशी आम्ही सकाळी फिरून नेहमीपेक्षा लवकरच घरी परतलो. त्यावेळी दोघे बुलेटवरून आले. ते पाठलागच करीत होते. त्यांनी ‘मोरे तुम्हीच का?’ अशी विचारणा मराठीतून केली. त्यानंतर सर्व प्रकार घडला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नसल्याचे पानसरे यांना प्रचंड चीड होती. ती चीड ते नेहमी बोलून दाखवीत. मारेकरी सापडायला हवेत, असे ते म्हणत. ‘हू किल्ड करकरे’ या विषयावर त्यांनी जागृतीसाठी विरोध असतानाही व्याख्यान घेतले. ते कमालीचे विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा दृष्टिकोन मानवतावादी होता. माणसालाच देव मानत. या मुद्द्यावर त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ते विचाराने पक्के होते. ते चळवळीत सक्रिय असल्याने मुलांचा सांभाळ मोठ्या जबाबदारीने पार पाडला. आता त्यांचा विचार मी पुढे नेणार आहे. माझ्या परीने मी लढतच राहणार आहे.
हल्ल्याआधी वकिलांचा फोन
त्यांना अनेकवेळा धमक्यांची पत्रे आली. यावर ते ‘माझे विचार कोणाला पटत नाहीत, ते असे काम करीत असतात,’ असे सांगत. त्यांनी नेहमी याकडे दुर्लक्ष केले. त्या दिवशी सकाळीही एका वकिलांचा फोन आला होता. संभाषणात मी केस जिंकणारच, असे ते म्हणाले, असे उमा यांनी सांगितले. त्यामुळे हल्ल्याआधी फोन करणारे वकील कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून विचारणा
उमा यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी त्वरित कुटुंबीयांशी यासंबंधी विचारणा केली. मुलाखतीमधील माहितीमुळे तपासात अडथळा येऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे पानसरे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते काळजीत पडले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The attacker can not remember

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.