उपजिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल
By Admin | Updated: June 2, 2015 01:27 IST2015-06-02T01:27:53+5:302015-06-02T01:27:53+5:30
गडहिंग्लजमध्ये ‘मनसे’चे आंदोलन : रुग्णांच्या हेळसांडप्रकरणी अधीक्षकांची खुर्ची पेटविली

उपजिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल
गडहिंग्लज : डॉक्टरांच्या अनियमित वेळा, रुग्णांची हेळसांड, स्वच्छतेचा अभाव, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, आदी अनेक कारणास्तव येथील ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल केला. अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे यांची खुर्ची बाहेर आणून पेटवत त्यांना रुग्णालयातून जाण्यास भाग पाडले.
गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांतील सर्वसामान्य जनतेसाठी ‘आरोग्यदायिनी’ असणारे येथील उपजिल्हा रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून समस्येंच्या गर्तेत सापडले आहे. विविध पक्ष आणि संघटनांकडून अनेकदा आंदोलने होऊनही रुग्णालयाच्या कारभारात कोणताही फरक पडला नाही. तक्रारींचा जाब विचारण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास रुग्णालय गाठले.
रुग्णांच्या बेडवर बेडशीट्स नाहीत, रुग्णालयातील स्वछतागृहे तसेच आवार अस्वच्छ आहे, बहुतांश डॉक्टर जाग्यावर नाहीत, आदी अनेक कारणांचा जाब कार्यकर्त्यांनी डॉ. कुरुंदवाडे यांना विचारला. त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच कुरुंदवाडे यांना तुम्ही या खुर्चीवर काम करण्यास लायक नसल्याचे सांगत त्यांची खुर्ची बाहेर आणून पेटवून देण्यात आली. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारास तुम्हीच जबाबदार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी डॉ. कुरुंदवाडे यांना रुग्णालयातून जाण्यास भाग पाडले. तसेच परत आल्यास मोडतोड करण्याचा इशारा देण्यात आला. (वार्ताहर)