आष्ट्यात जातपंचायतीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 19, 2014 23:50 IST2014-12-19T23:50:02+5:302014-12-19T23:50:24+5:30
बलात्काराच्या प्रयत्नाची फिर्याद : जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी

आष्ट्यात जातपंचायतीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल
आष्टा : आष्टा येथील कोल्हाटी समाज जातपंचायतीचे पाटील दिलीप यशवंत जावळे व अन्य १५ जणांनी एका अल्पवयीन मुलीचा इस्लामपूर येथील तरुणाशी परस्परच विवाह ठरविला. संबंधित मुलीच्या आईने या विवाहास विरोध केल्यानंतर त्यांनी समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी देत मुलीच्या आईकडे दंडाची मागणी केली. यावेळी बलात्काराचा प्रयत्न केल्याची फिर्याद मुलीच्या आईने शुक्रवारी आष्टा पोलिसांत दिली आहे. यानंतर जावळे व अन्य पंधरा जणांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टा येथील कोल्हाटी समाजातील एका लहान मुलीच्या विवाहासंदर्भात जातपंचायतीचे पाटील दिलीप जावळे, वसंत जावळे, अशोक जावळे, विजय जावळे (रा. महादेवनगर, इस्लामपूर), सदू मोरे, रंजना मोरे, विश्वास जावळे, संदीपजावळे, दिनकर सदू मोरे (सर्व रा. आष्टा) हे दि. १० नोव्हेंबर रोजी संबंधित मुलीच्या घरी आले. ‘आम्ही मुलीचा विवाह इस्लामपूर येथील किरण जावळे याच्याशी ठरविला आहे’, असे आईला सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने, ‘मुलगी लहान असून मुलगा व्यसनी असल्याने विवाहास विरोध केला. त्यानंतर ‘समाजातून बहिष्कृत करु, मुलीचा विवाह होऊ देणार नाही’, अशी धमकी देऊन ते सर्व निघून गेले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मुलीची आई व इतर लोक इस्लामपूरला दिलीप जावळे यांच्याकडे गेले. तिथे जावळे यांनी सर्वांना शिवीगाळ करीत जातीतून बहिष्कृत केले व जातीत यायचे असेल तर २० हजार रुपये द्या, असे सांगितले. यावर मुलीच्या आईने, पैसे नसल्याने नंतर देतो असे सांगून त्या आष्ट्यात आल्या.
बुधवार दि. १० डिसेंबर रोजी पंचायतीचे पाटील व इतर लोक आष्टा येथे आले व त्यांनी २० हजारांची मागणी केली. संबंधित महिलेने दंड म्हणून १० हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम नंतर देतो असे म्हणताच, दिलीप जावळे याने या महिलेचा हात धरला व अंधारात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर दिलीप जावळे व इतर सर्व लोक पळून गेले. मनात भीती निर्माण झाल्याने संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली नाही. आष्टा येथील समाजाच्या सर्व महिला व इतरांनी धीर दिल्यानंतर त्यांनी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)