मोतीनगरमध्ये व्याजासाठी सावकाराचा महिलेवर अत्याचार

By Admin | Updated: May 12, 2016 00:49 IST2016-05-12T00:45:42+5:302016-05-12T00:49:57+5:30

कुटुंबास मारहाण : प्रापंचिक साहित्याची तोडफोडही केली

Atrocities on women in Motinagar | मोतीनगरमध्ये व्याजासाठी सावकाराचा महिलेवर अत्याचार

मोतीनगरमध्ये व्याजासाठी सावकाराचा महिलेवर अत्याचार

कोल्हापूर : मोतीनगर येथे घरखर्चासाठी वीस टक्के व्याजाने घेतलेल्या दहा हजार रुपयांच्या व्याजापोटी खासगी सावकाराने महिलेवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलेसह तिच्या कुटुंबास बुधवारी मारहाण करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केल्यानंतर सावकाराचे घृणास्पद कृत्य समोर आले. संशयित आरोपी धमेंद्र शिवलाल बागडे (रा. मोतीनगर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोतीनगर येथे राहणाऱ्या पीडित महिलेने धमेंद्र बागडे याच्याकडून घरखर्चासाठी दहा हजार रुपये वीस टक्के व्याजाने घेतले होते. सहा महिने व्याज दिले. त्यानंतर आर्थिक अडचण आल्याने महिला व्याज देऊ शकली नाही. तिच्या गरिबीचा गैरफायदा घेत संशयित धमेंद्र बागडे याने व्याजापोटी तिच्यावर अनेकवेळा लै अत्याचार केला. बुधवारी दुपारी त्याने महिलेच्या पती व दिराकडे व्याजाची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास हा वाद जातपंचायत कमिटीद्वारे मिटविण्याचा प्रयत्न करत असताना धमेंद्र बागडे, कल्पना बागडे, बसंती बागडे, संदीप बागडे, करिश्मा बागडे यांनी पीडित महिलेसह तिच्या पती, दीर व भावजयवर हल्ला चढविला. बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून चाकूने हल्ला केला तसेच घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. जखमी अवस्थेत महिला व नातेवाईक राजारामपुरी पोलिस ठाण्यात आले. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांची भेट घेऊन झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी या सर्वांना सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. यावेळी पीडित महिलेच्या पतीने सीपीआर पोलिस व पत्रकारांना खासगी सावकार धमेंद्र बागडे याने व्याजाच्या बदली आपल्या पत्नीवर अत्याचार केल्याचे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

खात्री करूनच गुन्हा
पीडित महिलेने दिलेल्या माहितीची खातरजमा करून संशयित सावकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल. चौकशीमध्ये तसा काही प्रकार आढळून न आल्यास मारहाणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Atrocities on women in Motinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.