सदाशिव मोरेआजरा : बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होत चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यासाऐवजी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. पेपरमध्ये चलनी नोटा ठेवणे, परीक्षा नंबर लिहीणे, आपण, आई - वडील कॅन्सरने आजारी असल्याचे कारण पेपरमध्ये लिहून सहानुभूती मिळवितात. आज, इंग्रजी पेपरला जाण्यापूर्वी आजऱ्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याने अगरबत्ती-कापूर जाळून, नारळ फोडून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. या प्रकाराची चर्चा आजरा शहरासह परिसरात रंगली आहे.परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांना कॉपी करणार नसल्याची शपथ देण्यात आली. शपथ घेतल्यानंतर संबंधीत विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात गेला. बाजारातून आणलेली अगरबत्ती लावली, कापूर जाळला व नारळ फोडून मोठ्याने आजचा इंग्रजीचा पेपर सर्वांना सोपा जाऊ दे, सर्वच विषयात सर्वांना चांगली गुण मिळू देत असे गाऱ्हाणे घातले. व नारळाचे भकल ओवाळून दोन्ही बाजूला टाकत परीक्षा केंद्रात प्रवेश केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. दरम्यान, याठिकाणी असलेल्या काही पालकांनी हा प्रकार थांबविण्याऐवजी हसतमुखाने त्याचे स्वागत केले. तर काही विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करीत मोबाईलवर फोटो काढले. पेपर झाल्यानंतर सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरलही केले.
HSC/12th Exam: अगरबत्ती-कापूर जाळला, नारळ फोडून विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात प्रवेश केला; आजऱ्यात रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:41 IST