आसुर्लेकर गटाला मिळणार उभारी
By Admin | Updated: May 12, 2015 23:44 IST2015-05-12T21:41:47+5:302015-05-12T23:44:14+5:30
जिल्हा बँकेतील विजय : अडचणीच्या वेळी पद मिळाल्याने होणार बांधणी

आसुर्लेकर गटाला मिळणार उभारी
सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेपासून वंचित आणि चातकाप्रमाणे सत्तेची वाट पाहणाऱ्या गटाला या संधीमुळे नव्याने बाळसं (उभारी) आलं आहे. सत्तेअभावी गटाचे हे वृक्ष सुकून जात असताना जिल्हा बँकेतील संधीमुळे पाटील गट पुन्हा ताजातवाना झाला आहे.
जिल्हा परिषद सदस्य आणि दत्त आसुर्ले-पोर्ले साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यामुळे बाबासाहेब पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मुसंडी मारली होती. पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावात आपला स्वत:चा गट निर्माण केला. त्यांनी दत्त साखर कारखान्यावर दोनवेळा सत्ता मिळविली. परंतु, तालुक्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे कारखान्याची सूत्रे हातातून गेली. त्यामुळे कुठेच सत्ता नसल्याने गटातील कार्यकर्ते हळूहळू बाजूला गेली आहेत. नसानसांत राजकीय पिंड असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी खचून न जाता कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांशी संपर्क ठेवला. २०११ ला त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता.
राजकारणात थांबला तो संपला, पण पराभवाने खचून न जाता त्यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून लढवली. त्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. ताकद नसतानासुद्धा ही निवडणूक लढविण्याचे धाडस बाबासाहेबांनी दाखविल्याबद्दल तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात होते. ही निवडणूक लढविली, तर त्यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेची संधी मिळणार होती. म्हणूनच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. अशा वेगवेगळ्या पराभवाच्या धक्क्याने गटातील कार्यकर्ते गंभीर झाले होते. गटाला एका मोठ्या संधीची आवश्यकता होती. राजकारणात कोण कधी वरती जाईल व कोण कधी संपेल याचा अनुभव राजकीय वर्तुळात अनुभवयास मिळतो. त्याचाच प्रत्यय बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे. संपत चाललेल्या पाटील गटाला बँकेतील प्रतिनिधीत्वामुळे पद मिळाले आहे. त्यामुळे हा गट तालुक्यात पुन्हा नव्याने ताजातवाना होऊन राजकीय सारीपाठावर इतर गटाला व पक्षांना डोकीदुखी ठरणार आहे का?