‘असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्’तर्फे सोमवारी महापुराच्या समस्येबाबत चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:36+5:302021-08-21T04:29:36+5:30
कोल्हापूर : असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि.२३) सकाळी साडेनऊ वाजता रेसिडेन्सी क्लबमध्ये ...

‘असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्’तर्फे सोमवारी महापुराच्या समस्येबाबत चर्चासत्र
कोल्हापूर : असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि.२३) सकाळी साडेनऊ वाजता रेसिडेन्सी क्लबमध्ये कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या समस्येच्या निराकरणाबाबत चर्चासत्र होणार आहे. त्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती, तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील असतील, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूरच्या बांधकाम, आर्किटेक्ट क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून असोसिएशन कार्यरत असून, सध्या ५५० सभासद आहेत. वर्धापन दिनानिमित्त वर्षभरात असोसिएशनच्या वतीने भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याची सुरुवात महापुराबाबतच्या चर्चासत्राने होणार आहे. त्यात ग्राम आणि नगरविकासाबाबत तांत्रिक मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्बंधांना अनुसरून केवळ शंभर जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. अन्य सभासद ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची माहिती अजय कोराणे यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज डोंगळे, खजानिस उमेश कुंभार, संचालक उदय निचिते आदी उपस्थित होते.
चौकट
असोसिएशनचे वर्षभरातील विविध उपक्रम
शहराच्या नव्या विकास आराखड्यासाठी तांत्रिक सूचना, मार्गदर्शन करणे. एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीबाबत आर्किटेक्टस्, इंजिनिअर्सची मार्गदर्शन कार्यशाळा घेणे. पूर नियंत्रणाकरिता शासन, प्रशासनाला अभ्यासपूर्ण सूचना करणे. कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत तांत्रिक चर्चासत्र, बाबूभाई परीख पुलाच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा करणे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, टेक्नो लीगल सेलची स्थापना, बिल्डो हे बांधकाम साहित्याचे प्रदर्शन, असोसिशनचे संशोधन व विकास केंद्र उभारणीसाठी शासनाकडून जागा मिळविणे.