सहायक नगररचना अधिकारी जाळ्यात
By Admin | Updated: September 3, 2015 00:04 IST2015-09-03T00:02:27+5:302015-09-03T00:04:05+5:30
‘लाचलुचपत’ची कारवाई : दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

सहायक नगररचना अधिकारी जाळ्यात
कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर मालकाचे नाव लावण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहायक नगररचना अधिकाऱ्यास बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. संशयित आरोपी समीर अरविंद जगताप (वय ४४, रा. बिबवेवाडी, पुणे, सध्या रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील उपजिल्हाधिकारी नागरी समूह कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र शरद्चंद्र देसाई हे हेमंतकुमार विजयकुमार शहा यांच्या स्वस्तिक कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये आॅफिस इंजिनिअर म्हणून नोकरीस आहेत. शहा यांनी कंपनीची सर्व शासकीय कामे करण्याचे अधिकारपत्र देसाई यांना दिले आहे. शहा यांनी लिलावाद्वारे उजळाईवाडी येथील चौ. मी. जमीन २०१० मध्ये खरेदी घेतली आहे; परंतु ही जमीन अहस्तांतरणीय स्वरूपाची असल्याने शहा यांचे सात-बाराला नोंद लावता येत नसल्याचे येथील तलाठ्यांनी सांगितले. त्यानंतर देसाई यांनी प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कमाल जमीन धारणा कायदा अंतर्गत करवीर विभाग यांच्याकडे अर्ज केला.
यावेळी प्राधिकारी अधिकाऱ्यांनी देसाई यांना मुंबई येथील नगरविकास खात्याकडे अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अर्ज केला; परंतु तेथून काम झाले नाही. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात २०१४ मध्ये याचिका दाखल केली. त्यामध्ये मार्च २०१५ ला न्यायालयाने सदर जमिनीस मालकाचे नाव लावण्यासाठी निकाल दिला.
देसाई यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला. खरेदी केलेल्या जमिनीस शहा यांचे सात-बारा उताऱ्यास नाव लावण्याची शिफारस करण्यासाठी सहायक नगररचना अधिकारी जगताप याने २५ लाख आपणास व वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, असे सांगितले.
देसाई यांनी मालक शहा यांना याची कल्पना दिली. त्यांनी जगतापच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यास सांगितले.
देसाई यांनी १९ आॅगस्ट रोजी पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली. दरम्यान, पथकाने तक्रारीची खातरजमा केली असता जगताप याने देसाई यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती पहिल्या टप्प्यात पाच लाखांची मागणी केली होती. त्यानुसार मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर देसाई यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना संशयित समीर जगताप याला अटक केली. त्यानंतर शनिवार पेठेतील कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी सुरू होती.
रात्री उशिरा त्याची करवीरच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. आज, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पैसे मोजताना झडप
फिर्यादी राजेंद्र देसाई यांच्यासोबत दोन शासकीय पंच पाठविले होते. मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी जगताप यांची भेट घेतली. यावेळी देसाई यांनी पैसे आणल्याचे सांगितले. त्याने त्यांच्या हातामध्ये प्लास्टिकची पिशवी देऊन त्यामध्ये पैसे ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आजूबाजूला पाहून त्यांच्याशी बोलतच तो पिशवीतून पैसे बाहेर काढून मोजू लागला. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप टाकून त्याला पकडले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे त्याला घाम फुटला.
पुण्यातील घराची झडती
समीर जगताप याचे पुणे येथे मध्यवस्तीत घर आहे. त्याचे कुटुंबीय या ठिकाणीच राहते. तो गेल्या चार वर्षांपासून कोल्हापुरातील उपजिल्हाधिकारी नागरी समूह कार्यालयात कार्यरत आहे. सध्या तो एकटाच पैलवान नामदेव पाटील (देशपांडे गल्ली, मंगळवार पेठ) यांच्या घरी भाड्याने राहतो. या घरासह त्याच्या पुण्यातील घराची रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती. त्याच्या बँक खात्यांचीही पोलीस माहिती घेत आहेत.
तिसरी मोठी कारवाई
लाचलुचपत विभागाने २००७ मध्ये सात लाख रुपयांची लाच स्वीकारताना विक्रीकार उपायुक्त मेखाळे यांना अटक केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये कबनूर येथे सर्कलला अडीच लाख, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव परशुराम चव्हाण एक लाख, पोलीस नाईक संजय जाधव एक लाख, आदींना लाचप्रकरणी अटक केली होती. समीर जाधव याला दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. ही तिसरी मोठी कारवाई आहे.