सहायक निरीक्षकास अटक

By Admin | Updated: November 11, 2016 22:50 IST2016-11-11T01:03:11+5:302016-11-11T22:50:35+5:30

हुपरीतील घटना : दहा हजारांच्या लाचप्रकरणी हवालदारही जाळ्यात

Assistant inspector arrested | सहायक निरीक्षकास अटक

सहायक निरीक्षकास अटक

हुपरी/कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या संशयित आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत यशवंत सावंत (वय ४२, मूळ रा. वर्णे जिल्हा सातारा, सध्या शांतीधाम अपार्टंमेट, राजेंद्र नगर, कोल्हापूर) व हवालदार अप्पालाल मिस्त्री (वय ३९, रा. सिदनेर्ली, ता. कागल) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
दरम्यान, गेल्या एक वर्षाच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या हुपरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या आता पाच झाली आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईमध्ये ठाण्याचा प्रमुखच सापडला गेल्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.
हुपरी येथील अमोल मेथे या तरुणाने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. अमोल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यापूर्वी प्रकाश आण्णासाहेब काटकर यांच्याविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर काटकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. न्यायालयाने हुपरी पोलिस ठाण्यात दररोज हजेरीची अट काटकर यांना घातली आहे. न्यायालयाने घातलेल्या या हजेरीच्या अटीमध्ये सवलत देणे व न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्याच्या बदल्यात सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत यांनी २५ हजार रुपयांची लाच काटकर यांच्याकडे मागितली होती. त्यामध्ये तडजोड होऊन १० हजार रुपये देण्याचे ठरले होते .तसेच हुपरीतील हीरा चित्रमंदिर नजीकच्या एका बीअरबारमध्ये ही रक्कम गुरुवारी देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतर काटकर यांनी मंगळवारी (दि. ७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी या बीअरबारमध्ये सापळा लावला होता. पाच वाजून पन्नास मिनिटे झाली असताना हवालदार अप्पालाल मिस्त्री बीअरबारमध्ये येऊन काटकर यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना तेथे अगोदरच सापळा रचून प्रतीक्षेत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवालदार मिस्त्री याला रंगेहात पकडले. आपण ही रक्कम सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत यांच्या सांगण्यानुसार स्वीकारत होतो, अशी माहिती देताच सर्वजण पोलिस ठाण्यात आले व त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सावंत यांच्यावर अटकेची कारवाई केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम, सहायक फौजदार शाम बुचडे, पोलिस हवालदार श्रीधर सावंत, अमर भोसले, पोलिस नाईक मनोज खोत, मोहन सौंदत्ती, यांनी केली.एक वर्षाच्या कालावधीत हवालदार जालिंदर भाट, हवालदार दीपक सावंत, हवालदार धनाजी पाटील अशा लाचखोर पोलिसांवर कारवाई झाली आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत व हवालदार अप्पालाल मिस्त्री यांच्यावर कारवाई झाल्याने लाचखोरी करणाऱ्या पोलिसांची संख्या आता पाच झाली आहे . (प्रतिनिधी)


कायमच वादग्रस्त पोलिस ठाणे...
हुपरी पोलिस ठाणे हे कायमचं वादग्रस्त ठरले आहे. यापूर्वीही या पोलिस ठाण्यातील कर्मचारी लाचेसह अन्य प्रकरणांत वादग्रस्त ठरले आहेत. याचे कारण म्हणजे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुपरी, रांगोळी, पट्टणकोडोली अशी महत्त्वाची मोठी गावे येतात. त्याचबरोबर या हद्दीत आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे हे पोलिस ठाणे या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते.

शशिकांत सावंतला पोलिस
ठाण्यातूनच आणले...
हुपरी पोलिस ठाण्याचा नाईक संशयित आप्पालाल मेस्त्री याला लाचलुचपतने पकडल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सेवा बजावत असलेले संशयित शशिकांत सावंत याला आणले असल्याचे लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी पत्रकारांना सांगितले.

सावंत मूळ सातारा जिल्ह्यातील...
हुपरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संशयित शशिकांत यशवंत सावंत हा मूळ वर्णे (वय ४२, ता. जि. सातारा) येथील आहे. तो गेल्या वर्षीपासून या पोलिस ठाण्यात कार्यरत होता. सध्या तो (शांतीधाम अपार्टमेंट, एस-२, राजेंद्रनगर) कोल्हापूर येथे राहतो. दरम्यान, पोलिस नाईक आप्पालाल अब्बास मेस्त्री (३९, बक्कल नंबर १७१७) हा कोल्हापूर जिल्ह्यातील (मूळ सिद्धनेर्ली, ता. कागल) आहे.
८९ वी कारवाई;
तर वर्षातील २५ वी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी १३ मार्च २०१४ ला कोल्हापूर विभागाचा कार्यभार स्वीकारला. गेल्या पावणेतीन वर्षांत ८९ कारवाई, तर गुरुवारची कारवाई ही २५वी होती.

Web Title: Assistant inspector arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.