तपासास सहायक 'फॉरेन्सिक लॅब'

By Admin | Updated: November 28, 2014 23:42 IST2014-11-28T23:15:32+5:302014-11-28T23:42:32+5:30

आरोपींची ओळख तपासण्याचे काम : रक्त, विष, अ‍ॅसिड, रॉकेल, बॉम्बचे अवशेष, आदींची तपासणी झटपट, चार जिल्ह्यांना फायदा

Assistant 'Forensic Lab' | तपासास सहायक 'फॉरेन्सिक लॅब'

तपासास सहायक 'फॉरेन्सिक लॅब'

एकनाथ पाटील - कोल्हापूर --खून, खुनाचा प्रयत्न, विषप्राशन, रॉकेल ओतून पेटविणे, अ‍ॅसिड हल्ला, बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली साधनसामग्र्री यासारख्या गंभीर गुन्ह्यांतील पुरावे गोळा करून तपासासाठी पुणे वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविलेले रक्त, रसायन व अंश, आदींच्या नमुन्यांचे अहवाल सरासरी एक वर्षाने पोलिसांच्या हाती मिळत असत. आता मात्र कोल्हापुरात ही वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याने प्रलंबित गुन्ह्यांतील नमुन्यांचा निपटारा लवकर होऊन गुन्ह्यांतील आरोपींची ओळख सिद्ध करता येणार आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील पोलिसांच्या वेळेची बचत व नमुन्यांची प्रतीक्षा थांबणार असून, कित्येक वर्षांच्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने पोलिसांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा केली असून, त्यासंबंधीचा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे दिल्याचेही सांगितले होते. त्यांनी आठवड्यापूर्वी घोषणा केली आणि कोल्हापूर आणि नांदेड येथे नवीन प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कोल्हापूर प्रयोगशाळेला सांगली, सिंधुदुर्ग, आदी जिल्हे जोडण्यात येणार आहेत. या शाळेत जीवशास्त्र व रक्तजलशास्त्र, दारूबंदी व उत्पादन शुल्क, सामान्य विश्लेषण व उपकरणीय तसेच विषशास्त्र हे चार विभाग सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक लॅबचा सामान्य लोकांना उपयोग काय? याची माहिती घेतली असता चार जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा चढता आलेख असे, दिसून आले.
बॉम्बस्फोट, खून, खुनाचा प्रयत्न, विषप्राशन करून आत्महत्या, आदी गंभीर गुन्हे रोज घडत असतात. एखाद्या व्यक्तीचा खून झाल्यास तिचे रक्त जमिनीवर पडलेले असते. रक्ताने माखलेली माती, कपडे, तसेच आरोपीने वापरलेले हत्यार, त्यावरील रक्ताचे नमुने तपासासाठी घेतले जातात. हे सर्व पुरावे गोळा करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलामध्ये एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडून घेतलेले नमुने सीलबंद करून पुणे येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जातात. तपास अधिकाऱ्याने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर खुनातील रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट हा सरासरी सहा महिन्यांनी प्राप्त होतो. खुनाचा प्रयत्न, विषप्राशन किंवा रॉकेल ओतून एखाद्याला पेटविण्याचा प्रयत्न झाला असेल, तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड ओतले असेल, तर अशा गुन्ह्यांतील रक्त, रॉकेल व अ‍ॅसिड, आदींचे नमुनेही प्रयोगशाळेत पाठविले जातात.


७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांतील नमुने प्रलंबित
सध्या पुणे प्रयोगशाळेच्या अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, आदी जिल्हे असल्याने याठिकाणी नमुने तपासणीसाठी नंबर लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील सुमारे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांतील नमुने प्रलंबित आहेत. रोजच्या कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याचा पाठपुरावा एक-दोन वेळा करून पोलीसही त्याचा नाद सोडून देतात. जेव्हा येईल तेव्हा येईल, असे म्हणून ते वाट पाहत असतात.


पुणे वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे बहुतांश गुन्ह्यांतील नमुने तपासणीअभावी प्रलंबित आहेत. कोल्हापुरात ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास गुन्ह्यांचा निपटारा त्वरित होण्यास मदत होणार आहे.
-मा. शा. पाटील , पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखा (सीआयडी)



अहवालाची प्रतीक्षा
उजळाईवाडी बॉम्बस्फोट
वाशी बालिका खूनप्रकरण
लक्ष्मीपुरी अर्भक मृत्यू प्रकरण

Web Title: Assistant 'Forensic Lab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.