सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना बडतर्फ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:07+5:302020-12-05T04:55:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. त्यामुळे संतप्त ...

सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना बडतर्फ करा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावभागच्या सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी कारवाईत सापडलेल्या चौदा संशयित आरोपींचे मुंडण केले. हा प्रकार मानवी हक्काची पायमल्ली करणारा व मानवतेला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे लोहार यांना बडतर्फ करावे. ६ डिसेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने संस्थापक सुकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चार दिवसांपूर्वी आवळे गल्लीत जुगारअड्ड्यावर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला होता. त्यातील चौदाजणांना ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. त्यावेळी लोहार यांनी चिडून चौदाजणांचे मुंडण केले. त्यातील एकाने ही बाब मनाला लावून घेऊन बुधवारी (दि. २) न्यायालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही बाब गंभीर व निषेधार्ह आहे. त्यामुळे लोहार यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली.
हिंदू व मुस्लिम धर्मामध्ये संपूर्ण मुंडण करण्याबाबत धार्मिक अडचण असते तरी जबरदस्तीने चौदाजणांचे लोहार यांनी मुंडण केले आहे तसेच त्यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने उठाबशा काढायला लावल्या तसेच गुडघे खोपरावर रांगायला लावले. याबाबत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस नंदकुमार नांगरे, संदीप ठोंबरे, शीतल खरात, प्रमोद बिरांजे, सतीश भंडारे उपस्थित होते.