तालुक्याचे मूल्यांकन जिल्ह्यात बसून नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:26 IST2021-01-23T04:26:06+5:302021-01-23T04:26:06+5:30
गडहिंग्लज : स्वच्छतेबाबतीत गडहिंग्लज पंचायत समितीचा राज्यात प्रथम क्रमांक यावा यासाठी विविध उपक्रम पंचायत समितीने राबविले आहेत. परंतु, स्वच्छतेच्या ...

तालुक्याचे मूल्यांकन जिल्ह्यात बसून नको
गडहिंग्लज : स्वच्छतेबाबतीत गडहिंग्लज पंचायत समितीचा राज्यात प्रथम क्रमांक यावा यासाठी विविध उपक्रम पंचायत समितीने राबविले आहेत. परंतु, स्वच्छतेच्या गुणांचे मूल्यांकनासाठी नेमलेल्या समितीने तालुकास्तरावर भेट देऊन पाहणी करणे आवश्यक होते. कमिटीने तसे न करता जिल्ह्यात बसूनच तालुक्याचे मूल्यांकन कसे केले ? असा प्रश्न पंचायत समिती सदस्यांनी उपस्थित करून तालुक्याचे मूल्यांकन जिल्ह्यात बसून नको, असे विचारून जि. प. अधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजीचा सूर आळवला. गडहिंग्लज पंचायत समितीची मासिक आढावा बैठक सभापती रूपाली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पंचायत समितीने स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे पुणे विभागात ५ वेळा आणि २०११-१२ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१७ मध्ये तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे समितीतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले पाहिजे, असे विद्याधर गुरबे यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात ज्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे यापुढे कामांची यादी सदस्यांना द्यावी तसेच पंचायत समितीच्या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. त्यांच्याबाबत कडक भूमिका घेण्यासाठी सभापतींनी आपले अधिकार वापरावेत, अशी मागणी जयश्री तेली यांनी केली.
विविध निधीतून काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांचे खडीकरण-डांबरीकरण दर्जाहीन झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांना जबाबदार धरण्याची सूचना विठ्ठल पाटील यांनी दिली.
बैठकीस उपसभापती इराप्पा हसुरी, विजयराव पाटील, प्रकाश पाटील, इंदूमती नाईक, गटविकास अधिकारी शरद मगर आदी उपस्थित होते.