सभापती निवडीत विधानसभेचे ‘गणित’
By Admin | Updated: October 8, 2014 00:29 IST2014-10-08T00:24:01+5:302014-10-08T00:29:29+5:30
जिल्हा परिषद : राधानगरी, शिरोळ, हातकणंगलेतील राजकारण

सभापती निवडीत विधानसभेचे ‘गणित’
राजाराम लोंढे -कोल्हापूर -जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे ‘गणित’ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘राधानगरी’मध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी अभिजित तायशेटे यांना पाठबळ दिले. किरण कांबळे हे प्रकाश आवाडे यांचे कार्यकर्ते असले तरी ते जयवंतराव आवळे यांच्या मतदारसंघात येतात. कांबळे यांना संधी देऊन बौद्ध समाजात चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. ‘स्वाभिमानी’मध्ये शिरोळच्या जागेवरून बंडाळी उडाली असल्याने अनिल मादनाईक यांना बाजूला करत मराठा समाजातील सीमा पाटील यांची वर्णी लावत खासदार राजू शेट्टी यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखविली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी निवडी करताना नेत्यांची पुरती दमछाक उडाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदे करवीर तालुक्यात घेतल्याने चार सभापतिपदे इतर तालुक्यांना द्यावी लागणार होती. त्यानुसार इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. रूकडीच्या प्रमोदिनी जाधव यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी जयवंतराव आवळे यांनी गेल्यावेळेला ताकद लावली होती. त्यामुळे महिला बालकल्याण सभापतीसाठी जाधव यांचे नाव आघाडीवरच होते, पण आवाडे-आवळे यांनी एकत्र येत किरण कांबळे यांना संधी दिली. जयवंतराव आवळे हे मातंग समाजाचे आहेत, त्यांचे विरोधक शिवसेनेचे सुजित मिणचेकर हे बौद्ध समाजाचे आहेत. गेल्या वेळेला जातीच्या समीकरणाचा मोठा फटका आवळे यांना बसला होता. त्यामुळे सभापती निवडीत किरण कांबळे यांना संधी देत बौद्ध समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न आवळे यांनी केला.
शिक्षण सभापतिपदासाठी तायशेटे यांचे नाव अचानक पुढे आले असले तरी यामागेही राधानगरीचे राजकारण आहे. तायशेटे यांच्यासाठी काँग्रेसमध्ये काठावर असलेल्या सात सदस्यांनी प्रयत्न केले. त्यातच तायशेटे हे राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनी तायशेटे यांचे नाव निश्चित केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये शिरोळच्या उमेदवारीवरून बंड झाले. उल्हास पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत जातीचे गणित मांडत रिंगणात उडी घेतली आहे. लिंगायत, जैन विरोधात मराठा अशीच लढत येथे होत आहे. त्यामुळेच अनिल मादनाईक यांना बाजूला करत सीमा पाटील यांना संधी देत मराठा समाजाला खूश करण्याची मुत्सद्देगिरी शेट्टी यांनी दाखविली आहे.
ं‘सा. रे.’ आक्रमक !
आमदार सा. रे. पाटील यांनी विकास कांबळे यांच्यासाठी आपली ताकद लावली होती. पण आवाडे-आवळे यांच्या मनोमिलनामुळे कांबळे यांचे नाव मागे पडले तरीही आमदार पाटील हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे थेट आमदार पाटील यांच्याशी बोलले. अखेर पी. एन. पाटील यांनी काँग्रेस कमिटीत येऊन पाटील यांची समजूत काढल्यानंतर ते शांत झाले.
शेती अधिकारी ते सभापती !
किरण कांबळे हे हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यात ‘शेती अधिकारी’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मागे कोणताही राजकीय वारसा नसताना ते पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्य झाले आणि अडीच वर्षांत त्यांना थेट समाजकल्याण सभापतिपदाची संधी मिळाली.