विधानसभा आॅगस्टमध्ये?
By Admin | Updated: July 16, 2014 01:01 IST2014-07-16T00:52:10+5:302014-07-16T01:01:20+5:30
राजकीय पक्षांना वेध : प्रशासनाची लगीनघाई सुरू

विधानसभा आॅगस्टमध्ये?
कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या (आॅगस्ट) शेवटच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता गृहीत धरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी या सत्तारुढांसह सर्वच राजकीय पक्षांनी त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. दसरा संपल्यानंतर आणि दिवाळी सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ५ ते १९ आॅक्टोबरच्या दरम्यान, विधानसभेची दोन टप्प्यात निवडणूक होऊ शकते. मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १ आॅगस्ट रोजी ही अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांना चार्जिंग करण्यासाठी मेळावे, बैठका, निर्धारयात्रा, मतदार जोडो अभियान यासारखे उपक्रम राबवून राजकीय नेते मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत. रुसवे फुगवे काढत आहेत. उत्सुकांनीही आपल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. विविध उपक्रम व सार्वजनिक मोर्चे, मेळाव्यातून इच्छुक चमकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आगामी निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर मे महिन्यापासूनच सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मतदारयादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ३० जूनपर्यंत मतदार नोंदणीसाठी अभिनव उपक्रमही राबविले गेले. त्यातून चांगला प्रतिसादही मिळाला. आता मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करून १ आॅगस्ट रोजी अंतिम मतदारयादी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत जाहीर केली जाणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुलै यांनी सांगितले.
विधानसभेची निवडणूक गणपती उत्सव आणि दसरा झाल्यानंतर आणि दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीनेच सगळी तयारी दिसत आहे. गणपती उत्सवात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण असतो. दसऱ्यात तुलनेने कमी ताण असतो. त्यामुळेच
५ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबर या काळात निवडणूक घेण्याचे निश्चित केले जाऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. जर आॅक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक घेण्याचे निश्चित झाले, तर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होऊ शकते.
त्यामुळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. सरकारने केलेल्या कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही सरकारने निधी मंजूर केलेल्या कामांचा प्रारंभ करण्याचे नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)