उचगाव : उचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करा; अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना बुधवारी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, उचगावात मुख्य रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित एमआयडीसीकडे जा-ये करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मार्केट यार्ड व हुपरी चांदी बाजारपेठेसाठी उचगावमधून मोठ्या प्रमाणात लोक जात असतात. विद्यार्थी-विद्यार्थिनीही या रस्त्यावरून जात असतात. मात्र, मुख्य रस्त्यावरच खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होत आहेत. ग्रामदैवत मंगेश्वर देवाची यात्राही दोन महिन्यांवर आली आहे. या काळात उचगावमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे उचगावची स्वागत कमान ते आंबेडकर चौक रस्ता तत्काळ डांबरीकरण करण्यात यावा; अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. शिष्टमंडळात उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, उपशाखाप्रमुख कैलास जाधव, शफिक देवळे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, भूषण चौगुले, नितीन गाणबोटे, आदींचा समावेश होता.
फोटो : ०३ उचगाव रस्ता
ओळ : उचगाव (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना देताना शिवसैनिक.