गडकोट संवर्धनासाठी शासनाला जाब विचारणार
By Admin | Updated: May 22, 2015 00:55 IST2015-05-22T00:54:05+5:302015-05-22T00:55:25+5:30
युवराज संभाजीराजे यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची नियोजन बैठक

गडकोट संवर्धनासाठी शासनाला जाब विचारणार
कोल्हापूर : गडकोट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. वेळीच राज्य शासनाने गडकोट किल्ल्यांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास शासनाला रोखठोक जाब विचारू, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्ग रायगड येथे ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा, तुळजाभवानी मंडप येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव व्हावा. याकरिता सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मावळ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. राज्यातील गडकोट संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे. कारण हा इतिहास जर आजच्या पिढीला कळला नाही तर महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. हे विचार पोहोचण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा हे निमित्त आहे. राज्यातील गडकोटांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.कधी केंद्र शासनाकडे बोट दाखवायचे, तर कधी पुरातत्त्व खात्याचे भूत उभे करायचे, असा प्रकार करीत घोर फसवणूक केली आहे. यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही. गडकोट संवर्धनासाठी राज्यातील सर्व दुर्गप्रेमी संस्था, व्यक्ती यांना एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच शासनाला याबाबत रोखठोक जाब विचारला जाईल. औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या पत्नीच्या मकबऱ्याचा ३९ वेळा जीर्णोद्वार करण्यात आला आहे; तर शिवरायांच्या समाधीचा केवळ दोन वेळाच जीर्णोद्वार करण्यात आला आहे. असा दुजाभाव शासनाने केला आहे. याकरिता मुंबई, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, विदर्भ, आदी ठिकाणच्या संस्था प्रतिनिधींची समिती स्थापून सरकारवर दबावगट निर्माण केला जाईल. शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून मला केवळ मराठ्यांचे नेतृत्व करायचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेतृत्व करायचे आहे. शिवराज्याभिषेक समितीच्या नूतन अध्यक्षपदी सागर यादव यांची निवड संभाजीराजे यांनी केली. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, फत्तेसिंह सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, नगरसेवक विनायक फाळके, ‘छावा’चे राजू सावंत, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, संपतराव चव्हाण, राजू मेवेकरी, आदी उपस्थित होते.