शहरातील ड्रेनेजचा प्रश्न मागी
By Admin | Updated: January 20, 2015 00:52 IST2015-01-20T00:44:05+5:302015-01-20T00:52:26+5:30
कोल्हापूर महानगरपालिका : ताफ्यात ट्रक माऊटिंग जेटिंग मशीन दाखल

शहरातील ड्रेनेजचा प्रश्न मागी
कोल्हापूर : शहरातील ड्रेनेजलाईन बंद होऊन मैला रस्त्यावर वाहण्याच्या समस्येपासून आता शहरवासीयांची सुटका होणार आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या ताफ्यात आज, सोमवारपासून ४० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक ट्रक माऊटिंग जेटिंग मशीन दाखल झाले. महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते सायंकाळी विठ्ठल रामजी चौकात मशीनचे पूजन करण्यात आले.
शहरातील अनेक ड्रेनेजलाईन या ५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. तसेच नव्याने ७२ किलोमीटरची लाईन टाक ण्यात आली आहे. ३० वर्षांपूर्वीची लोकसंख्येची क्षमता असणारी शहरातील जुनी ड्रेनेजलाईन अडथळ्यांमुळे बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेकडे असणाऱ्या तीन हजार लिटर क्षमतेच्या मशीनद्वारे तसेच कर्मचारी हाताच्या साहाय्यानेच सळी ढकलून ड्रेनेजलाईनची स्वच्छता करतात. कर्मचाऱ्यांचा तुटवडा व मानवी कार्यक्षमतेवरील मर्यादा, यामुळे वारंवार ड्रेनेजलाईन चोक-अप होऊन रस्त्यांवर मैला वाहण्याचे प्रमाण अधिक होते. तुंबलेल्या ड्रेनेजलाईनमुळे प्रशासन व नगरसेवकांत हमरीतुमरीचे प्रसंग नेहमी घडत होते.
महापालिकेने नव्याने घेतलेल्या जेटिंग मशीनची क्षमता आठ हजार लिटरची आहे. टाटा चेसिसवर बसविण्यात आलेले हे मशीन अत्याधुनिक पद्धतीने उच्च दाब निर्माण करून पाईपलाईन स्वच्छ करते. अंतर्गत पाईप स्वच्छ करण्यासाठी या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे.
जेटिंग मशीनच्या पूजनप्रसंगी स्थायी समिती सभापती आदिल फरास, प्राथमिक शिक्षक मंडळ सभापती संजय मोहिते, नगरसेवक निशिकांत मेथे, डॉ. संदीप नेजदार, महेश जाधव, जालंधर पवार, महेश जाधव, राजू पसारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)