सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने मांडू

By Admin | Updated: December 29, 2014 00:22 IST2014-12-29T00:14:58+5:302014-12-29T00:22:05+5:30

भालचंद्र मुणगेकर : बहुजन विद्युत अभियंता फोरमचे द्विवार्षिक अधिवेशन

Ask the security question priority | सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने मांडू

सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने मांडू

कोल्हापूर : वीजकामगारांची सुरक्षितता, आरोग्य, पगारवाढ हे प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार आहे, अशी ग्वाही नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि राज्यसभेचे खासदार डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी दिली़ बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचे द्विवार्षिक चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आज, रविवारी दसरा चौक येथील मैदानावर झाले़ या अधिवेशनाचे उद्घाटन डॉ़ मुणगेकर यांच्या हस्ते झाले़ यानंतर ते ‘भारतीय कामगार कायदे व त्यांची अंमलबजावणी’ या विषयावर बोलत होते़ अध्यक्षस्थानी बहुजन फोरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर होते़
डॉ़ मुणगेकर म्हणाले, महाराष्ट्र वीज मंडळाचे तीन कंपन्यांत विभाजन करण्यास मी विरोध केला होता़ तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विजेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नव्हते़ वीजनिर्मिती करताना हा व्यवसाय आतबट्ट्याचा होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली नाही़ वीज ही अत्यावश्यक गरज असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वच घटकांबाबत व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे़
आर्थिक प्रक्रियेत गोरगरिबांना सामावून घेतले पाहिजे़ अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यांपैकी ९० टक्के कामगार कायदे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी केले होते़; पण या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही़ त्यामुळे सरकार कोणाचेही असो; पगार, सुरक्षितता आणि बदली यांबाबत अन्याय होऊ नये, यासाठी कामगार संघटनांनी सरकारवर दडपण आणले पाहिजे, असेही मुणगेकर म्हणाले़
काही जातीयवादी शक्तींमुळे देशातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडत आहे़ भारतासारख्या बहुसांस्कृतिक आणि बहुधर्मीय देशात धर्मांतरबंदीचा कायदा आणता येणार नाही़ धर्मांतरबंदी ही घटनाविरोधी आहे़ बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये बिघडत जात असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्वास्थ्याकडेही कामगारांनी लक्ष देण्याचे गरजेचे आहे, असे आवाहनही मुणगेकर यांनी केले़
प्रा़ डॉ़ राजेंद्र कुंभार म्हणाले, संघटित तसेच असंघटित क्षेत्रांतील कामगारांनी आपल्या प्रश्नापुरता संघर्ष न करता, व्यापक संघर्षासाठी सज्ज राहिले पाहिजे़ आमदार सुजित मिणचेकर यांनी वीजप्रश्नाबाबत विधिमंडळात आवाज उठविला असल्याचे सांगितले़
यावेळी पत्रकार योगेश कुंटे यांना डॉ़ मुणगेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले़ यावेळी वीजखात्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेतनगटनिहाय अधिसंख्य पदे निर्माण करून सामावून घेण्यात यावे, वर्ग तीन व चारची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तिन्ही कंपन्यांमध्ये सुसूत्रता आणावी, गुणवत्तावाढीसाठी कंपनीच्या प्रशिक्षण संस्थेतर्फेच कर्मचारी व अभियंते यांना प्रशिक्षण द्यावे, सोयीच्या किंवा नजीकच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी, तिन्ही कंपन्यांमधील ठेकेदारी पद्धती रद्द करावी, आदी ठरावही यावेळी करण्यात आले़
महावितरणचे मानव संसाधन कार्यकारी संचालक डॉ़ मुरहरी केळे, अनंत पाटील (सीआयआरओ), आयटी व्यवस्थापक योगेश खैरनार, महावितरण-कोल्हापूरचे प्रभारी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, फोरमचे सरचिटणीस राजन शिंदे, कार्याध्यक्ष एस़ पी़ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)


दाभोलकरांचे खुनी शोधण्यात चालढकल

डॉ़ नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन दीड वर्ष होत आले तरी खुनी सापडत नाहीत, ही बाब निषेधार्ह आहे़ दाभोलकरांच्या खुन्यांचा शोध लावण्यात महाराष्ट्र सरकारने चालढकलच केली आहे, असा आरोपही डॉ़ मुणगेकर यांनी केला़


बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमतर्फे रविवारी दसरा चौक मैदान येथे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना खासदार डॉ़ भालचंद्र मुणगेकर. शेजारी राजन शिंदे, सुजित मिणचेकर, शिवाजी वायफ ळकर, डॉ़ राजेंद्र कुंभार, अनंत पाटील, एस़ पी़ कांबळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Ask the security question priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.