ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

By Admin | Updated: October 19, 2015 23:56 IST2015-10-19T23:28:15+5:302015-10-19T23:56:50+5:30

आजऱ्यात लोकशाहीदिन : आगार व्यवस्थापकांकडे साकडे, राखीव जागावरही अतिक्रमण

Ask respect for senior citizens | ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

आजरा : एस. टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता एस. टी.मध्ये राखीव जागा ठेवल्या आहेत; परंतु ही सर्व मंडळी एस.टी.मध्ये उभी, तर महाविद्यालयीन तरुण जागा अडवितात. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा राहू दे, किमान वाहकांना आदराने वागायला सांगा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनीे आगार व्यवस्थापकांकडे केली.
आजरा तहसील कार्यालयात तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीदिन झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने एस. टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वर्षभरापूर्वी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात शपथ दिली होती; पण प्रत्यक्षात अंमलबजावाणीची गरज उपस्थितांनी बोलून दाखविली.वनविभागाच्यावतीने वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. प्रत्यक्षात किती झाडे जगली, हे मात्र समजू शकत नाही. त्यामुळे वृक्षलागवडीची तपासणी होऊन प्रत्यक्षात वृक्ष जगण्याचे प्रमाण किती आहे, याची तपासणी होण्याची गरज असून, २५ टक्के तरी वृक्ष जगतात का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वनखात्याकडून याची माहिती घेतली जाईल, असे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले.
आजरा-महागाव रस्त्यावर आजरा शहराच्या सीमेवर असणाऱ्या चित्री नदीवरील संताजी पुलाची दुरवस्था झाली असून, कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे, असे दिनकरराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी पूल दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून पाठविण्यात आले आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर अपघात घडल्यावरच तुम्ही लक्ष देणार का? असा प्रश्न तहसीलदारांनी करत किमान पुलाच्या धोकादायकतेबद्दल तेथे फलक तरी लावा. यासाठी बजेट मंजुरीची वाट पाहत बसू नका, अशा शब्दांत सुनावले. वीज वितरण कंपनीकडे दाखल तक्रारींबाबतही मार्गदर्शक सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केल्या. यावेळी दुय्यम निबंधक, आगार व्यवस्थापक, वीज कंपनीचे अधिकारी, नायब तहसीलदार डी. बी. कोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


माईकवरून बसस्थानकावर जाहीर करा
एस.टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न गंभीर असून, माईकवरून पुकारण्याबरोबरच वाहकांना वैयक्तिक सूचना देण्याबरोबरच जे वाहक यांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध थेट तक्रार देण्याचे आवाहन तहसीलदारांसह आगार व्यवस्थापक के. डी. मुरुकटे यांनी केले.
नागरिकांनीही
जाणीव ठेवावी
स्वच्छतेबाबत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता नागरिकांनीही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.

Web Title: Ask respect for senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.