‘दौलत’साठी आणखी महिन्याची मुदत मागणार
By Admin | Updated: July 31, 2015 01:07 IST2015-07-31T01:07:48+5:302015-07-31T01:07:48+5:30
बैठकीत निर्णय : चंदगड, आजरा, गडहिंग्लज कृषी प्रक्रिया संस्थेद्वारे ठेवी जमा करणार

‘दौलत’साठी आणखी महिन्याची मुदत मागणार
चंदगड : दौलत सहकारी साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेने दिलेली मुदत संपली आहे. ‘दौलत’वरील कर्जाचा डोंगर आवाक्याबाहेरचा आहे, हे जरी सत्य असले, तरी दौलतसाठी जिल्हा बँकेकडे आणखी एक महिन्याची मुदत मागायची, असा निर्णय गुरुवारी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील बैठकीत घेण्यात आला.
शेतकरी ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार, कार्यकर्ते यांच्या पाटणे फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नरसिंगराव पाटील होते.
जिल्हा बँक आपले ६१ कोटींचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी ‘दौलत’ची लिलाव प्रक्रिया करीत आहे. सहकारी तत्त्वावर असलेल्या ‘दौलत’ची विक्री झाल्यास शेतकरी, ऊस उत्पादक अडचणीत येणार आहेत. यासाठी ‘दौलत’चा लिलाव थांबवून जिल्हा बँकेचे कर्ज हप्त्याहप्त्याने भागविण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज कृषी प्रक्रिया (संस्करण) सहकारी संस्था मर्या., पाटणे फाटा, ता. चंदगड या नावाने कृषी प्रक्रिया संस्था स्थापन करून त्याद्वारे ठेवी जमा करण्याचे एकमुखी ठरविण्यात आले.
दरम्यान, ठेवी जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी म्हणून शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार यांचे शिष्टमंडळ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला भेटण्याचे ठरले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ आज, शुक्रवारी कार्वे येथे येणार आहेत. या ठिकाणीही त्यांची भेट घेण्याचे ठरले. यावेळी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, तानाजी गडकरी, विश्राम चिटणीस, संभाजी पाटील, पी. एस. नेवगे, कृष्णा पाटील, विष्णू पाटील, विष्णू गावडे, मारुती पटेकर, परशराम पाटील, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, आदींसह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)