वस्त्रनगरीस वेठीस धरणाऱ्या कामगारनेत्यांना जाब विचारा

By Admin | Updated: August 10, 2015 01:18 IST2015-08-10T01:18:35+5:302015-08-10T01:18:35+5:30

सागर चाळके : यंत्रमागधारक कृती समितीचा मेळावा; प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना आंदोलन चुकीचे असल्याची टीका

Ask the laborers holding garment workers | वस्त्रनगरीस वेठीस धरणाऱ्या कामगारनेत्यांना जाब विचारा

वस्त्रनगरीस वेठीस धरणाऱ्या कामगारनेत्यांना जाब विचारा

इचलकरंजी : सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप करून वस्त्रनगरीस वेठीस धरल्याबद्दल कामगार नेते ए. बी. पाटील यांना आज, सोमवारी जाब विचारण्यासाठी सकाळी अकरा वाजता यंत्रमागधारकांनी शिवाजी पुतळा चौकात जमण्याचे आवाहन तांबे माळ यंत्रमागधारक कृती समितीचे अध्यक्ष सागर चाळके यांनी केले. रविवारी रात्री तांबे माळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक सभागृहात झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यामध्ये चाळके बोलत होते. सायझिंग-वार्पिंग कामगारांचा गेले वीस दिवस संप सुरू असून, संपामुळे आता यंत्रमाग कारखानेसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद पडले आहेत. परिणामी वस्त्रनगरीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी यंत्रमागधारकांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यामध्ये जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, सायझिंग कृती समितीचे अध्यक्ष संतोष कोळी, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, पॉपलीन क्लॉथ पॉवरलूम संघटनेचे सचिन हुक्किरे, बंडोपंत लाड, तुकाराम पाटील, प्रकाश गौड, आदींची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी कामगारांचा संप चुकीच्या वेळी आणि किमान वेतनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना झाला असल्याबद्दल टीका केली.
मेळाव्याच्या शेवटी चाळके यांनी सायझिंग उद्योगामध्ये वारंवार संप होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम यंत्रमाग कारखान्यांच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना नुकसान सोसावे लागत आहे, असे सांगून कामगार संघटनेवर टीका केली. तसेच यंत्रमागधारकांनी आज सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा चौकात जमून तिथून सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चाने येणाऱ्या कामगार नेते पाटील यांना जाब विचारण्यासाठी जाण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)


जाब विचारण्याबाबत यंत्रमागधारक संघटनांमध्ये मतभेद
यंत्रमागधारकांचा मेळावा संपताच इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन या दोन्ही संघटनांचा चाळके यांनी जाहीर केलेल्या कामगार नेत्यांना जाब विचारण्याच्या आंदोलनास पाठिंबा नसल्याचे सतीश कोष्टी व दीपक राशिनकर यांनी सांगितले. परिणामी आजचे आंदोलन जाहीर झाले असले, तरी त्याबाबत यंत्रमागधारक संघटनांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले.

Web Title: Ask the laborers holding garment workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.