बहुगुणी तुळशीसह अश्वगंधा, रोपांच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:00+5:302021-05-07T04:24:00+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून दूर राहण्याकरिता नागरिक ॲलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक काढे आणि चूर्णालाही प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात रोपवाटिकांमधून ...

बहुगुणी तुळशीसह अश्वगंधा, रोपांच्या मागणीत वाढ
कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून दूर राहण्याकरिता नागरिक ॲलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक काढे आणि चूर्णालाही प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात रोपवाटिकांमधून बहुगुणी तुळस, अश्वगंधा, गवती चहा, गुडुची, पिंपळी, कोरफड, ब्राह्मी, केविया, शतावरी आदी रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवसाकाठी हजारो रोपे घरी लावण्यासाठी स्वत:हून नेऊ लागली आहेत. त्यामुळे शुद्ध हवेबरोबर आयुर्वेदिक काढ्यांमुळे माणसांचा श्वास मोकळा तर होतोच आहे. या शिवाय हवेतून शुद्ध ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाणही वाढण्यास मदत होऊ लागली आहे.
कोरोनाचा विषाणू फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे श्वसन व्यवस्था सुधारली तरच कोरोना संसर्गापासून माणसांची सुटका होते. या सर्वांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदात तुळसीला सर्वाधिक महत्त्व आहे. यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. याचे तेल एक जैव प्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते. त्यामुळे याचा वापर विविध आजारांवर केला जातो. म्हणूनच घरगुती उपचारांमध्ये अंगणातील तुळस म्हणजे औषधांचे भांडार समजले जाते. सर्दी, खोकला, ताप, दातदुखी, श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसाचे रोग, हृदयरोग हे सर्व रोग पळवून लावण्यासाठी तुळसीचा वापर केला जातो. तुळस पानाचंचे दोन थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते. पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जीवाणूंचे संक्रमण कमी होते. घरासमोरील अंगणात तुळस असल्यास घरातील हवा शुद्ध होेते. यासोबतच अश्वगंधा, गवती चहा, कोरफड, पिप्पली, गुडुची, आवळा, ब्राह्मी, केविया, आदी आयुर्वेदिक वनस्पती रोपांनाही मागणी वाढली आहे. दरही अगदी २० ते ५० रुपयांपर्यंत प्रती रोप आहेत.
चौकट
अश्वगंधा : या वनस्पतीच्या सेवनाने घोड्यासारखा उत्साह व वाजी शक्ती अंगामध्ये येते. म्हणूनच हिला अश्वगंधा असे म्हटले जाते. कोरोना संसर्गातही कफ, वात विकारावर ही बहुगुणी मानली जाते.
आमलकी (आवळा) : आवळा हा त्रिदोषहर, कफ, हृदय, यकृत उत्तेजक, दीपनीय आहे. भरपूर जीवनसत्त्वे यात आहेत.
पिप्पली-कटू रसात्मक, अनुष्ण शीत असलेली पिंपळी ही कास, श्वास, राजयक्ष्मामध्ये उपयुक्त आहे. आम, कफ, मेद यांचे पाचन करून रसायन म्हणून ही कार्य करते.
गुडुची : ही वनस्पती त्रिदोषनाशक, ज्वरघन असून एक श्रेष्ठ रसायन म्हणून मानवी शरीरास उपयोगी आहे.
गवती चहा : मुख्यत हा झुडपांच्या पानांपासून मिळणारा तृण वनस्पती आहे. तिचा वापर करून चहा घेतला तर ताजेतवाने व आळस निघून जातो.
शतावरी : मधुर-तिक्त रसात्मक व शीतवीर्य असलेली शतावरी ॲन्टी ऑक्सिडंट म्हणून काम करते.
कोट
अश्वगंधा, गवती चहा, कोरफड, पिप्पली, गुडुची, शतावरी, आवळा, ब्राह्मी आदी आयुर्वेदिक वनस्पती बहुगुणी आहेत. याशिवाय नैसर्गिकरित्या वायूचे शुद्धीकरण करतात. असंख्य प्राणवायू शोषून घेतात. जास्त प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करतात. कोरोनाच्या काळात या वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
डाॅ. अजित राजिगरे, एम.डी. आयुर्वेदाचार्य
कोट
कोरोना काळात तुळस, अश्वगंधा, ब्राह्मी, गवती चहा, कोरफड, इन्शुलन, ओवा, आदी रोपांना मागणी वाढली आहे. यापूर्वी कार्यक्रमांमध्ये रोप वाटावे लागत होते. आता स्वत: हून अनेक मंडळी ही रोपे विकत घेत आहेत.
रोहित शिंदे, रोपवाटिका चालक