‘त्या’ अश्राप जिवाला हवाय निवारा!

By Admin | Updated: July 8, 2016 00:58 IST2016-07-08T00:21:50+5:302016-07-08T00:58:58+5:30

पावसामुळे दैन्यावस्था : सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच मुक्काम

'That' Ashramp Ziva is the needy shelter! | ‘त्या’ अश्राप जिवाला हवाय निवारा!

‘त्या’ अश्राप जिवाला हवाय निवारा!

मुरलीधर कुलकर्णी -- कोल्हापूर --जमिनीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरूण घेऊन तो गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच राहतोय. अंगावरच्या कपड्यांचीही त्याला शुद्ध नाही. कुणीतरी दिलेल्या शिळ्यापाक्या अन्नावरच त्याची गुजराण सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे.
दसरा चौकाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फुटपाथवर त्याचा मुक्काम आहे. तो येथे कधी आला, कसा आला, याबद्दल त्याला विचारले तर तो फारसे काही बोलत नाही; परंतु रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांना मात्र तो कधीच, कसलाही त्रास देत नाही. कोणी काही खायला दिले तर तो कसुनसे हसून नमस्कार करतो.
पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे. मुसळधार पावसात दिवसभर तो फुटपाथवरच बसून असतो. रात्र झाली की तेथेच आडवा होतो. अंगावरचे कपडे, पांघरूण ओले चिंब झाले तरी त्याची त्याला शुद्ध नाही. त्याच्या हालचालीही आता पूर्वीपेक्षा मंदावल्या आहेत, असे आजूबाजूचे लोक सांगतात. अनेक दिवस अहोरात्र पावसात भिजल्याने त्याच्या अंगात तापही
मुरला असावा, अशी शंका येते. त्याचे दिवस-रात्र भिजणे असेच
पुढे चालू राहिल्यास त्याच्या जिवालाही धोका होऊ
शकतो.
या अश्राप जिवाला आज निवाऱ्याची गरज असून, त्याच्या पुनर्वसनासाठी समाजातील
एखाद्या दानशुराने किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेने पुढे येण्याची गरज आहे.

नाव विचारले तर हेमंत साळोखे म्हणून सांगतो.
घर कुठे आहे? असे विचारले तर रंकाळ्याजवळ म्हणतो.
माझी एक संजना नावाची मावशी साने गुरुजी वसाहतीत राहते, असेही तो सांगतो; पण त्या मावशीचे आडनाव काय? तिचे घर नेमके कुठे आहे? असे विचारले तर त्याला काहीच सांगता येत नाही.
घरी कधी जाणार? म्हणून विचारले तर ‘सच्या मला न्यायला येणार आहे.
तो आला की मी दिवाळीला घरी जाणार’ असे भाबडेपणाने तो सांगतो.
हा सच्या कोण आणि तो नेमका कधी येणार? हे मात्र त्याला सांगता
येत नाही.

Web Title: 'That' Ashramp Ziva is the needy shelter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.