मुन्नांच्या विजयात अरूंधतींचा सिंहाचा वाटा..

By Admin | Updated: May 19, 2014 00:40 IST2014-05-19T00:38:50+5:302014-05-19T00:40:13+5:30

प्रिया दंडगे ल्ल कोल्हापूर ‘माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा क्षण आहे... आमच्या दोघांच्या दहा वर्षांच्या कष्टाला जनतेने पोचपावती दिली आहे..

Arundhati's valuable contribution in the victory of Munna | मुन्नांच्या विजयात अरूंधतींचा सिंहाचा वाटा..

मुन्नांच्या विजयात अरूंधतींचा सिंहाचा वाटा..

 प्रिया दंडगे ल्ल कोल्हापूर ‘माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा क्षण आहे... आमच्या दोघांच्या दहा वर्षांच्या कष्टाला जनतेने पोचपावती दिली आहे... याहून अधिक परमेश्वराकडे काय मागायचं? या भारावलेल्या शब्दात अरूंधती महाडिक यांनी आपली भावना व्यक्त केली. पती धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे आनंदित झालेल्या अरूंधती यांचा खरेतर या विजयात सिंहाचा वाटा आहे. गेली दहा वर्षेआणि विशेषत: मागच्या साडेतीन वर्षात अरूंधतींनी कामाचा धडाकाच लावला होता. आज त्यांच्या रूईकर कॉलनी येथील निवासस्थानी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच महाडिक कुटुंबातील महिलांनी टी.व्ही. समोर बैठक जमवली होती. साधारण अकरा वाजता महाडिक पाचव्या फेरीअखेर सोळा हजार इतक्या मतांनी पुढे, असे ऐकायला मिळाले आणि घरातील ताण हलका झाला.’ आता लीड तुटणार नाही असे म्हणत आनंदाचे वातावरण तयार झाले. मुन्ना यांच्या काकी, आमदार महादेवराव महाडिक यांच्या पत्नी मंगल महाडिक यांनी वाटीतून साखर आणली आणि सर्वांचेच तोंड गोड केले. अरूंधती यांच्या मैत्रिणीही हळूहळू जमू लागल्या होत्या. प्रत्येक फेरीअखेर साहेबांचे मताधिक्क्य वाढते आहे, अशा चर्चा सुरू झाल्या. कुणीतरी गुलालाची वाटी आणली आणि अरूंधतींना गुलाल लावला. अरूंधतींच्या आई विजयश्री निंबाळकर, सासूबाई मंगल महाडिक, माई महाडिक, काकी साधना महाडिक, मंगल महाडिक, जाऊबाई सोनाली महाडिक, शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांनी एकमेकींना गुलाल लावला. तरीही अरूंधतींच्या चेहर्‍यावरचा ताण पूर्णत: निवळला नव्हता. बंगल्याच्या बाहेर लॉनवर बसलेल्या आपल्या वडिलांना अरूंधतींनी थोडासा गुलाल लावला आणि त्यांना गुलाबजामून भरवला, एक क्षणभरच बापलेक नि:शब्द झाले... धनंजय महाडिक घरीच खोलीत बसून बातम्या पहात होते. त्यांना अरूंधतींनी वरती जाऊन मिठाई दिली. खाली कार्यकर्त्या महिला येऊ लागल्या होत्या. भागिरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी बाहेर लॉनवरच अरूंधतींना गुलाल लावला. ‘भीमा’ बंगल्यासमोर पहिली फटाक्याची माळ लागली आ़णि विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. साहेबांनी कु ठलेही पद नसताना काम केले. त्यांना पोचपावती मिळाली. आता काम करायला हुरूप आला आहे. ..मी आज खूप आनंदात आहे...’ अरूंधती सांगत होत्या. विजय जवळ आलाय, याचा आनंद असला तरी निकाल जाहीर होईपर्यंत चैन पडणार नाही, असे म्हणत होत्या. त्यांच्या मैत्रिणींनी गुलाबजामुन आणून त्यांना भरवला आणि ‘विजय आपलाच आहे’ असा विश्वास दिला. तोवर बारा फेर्‍या झाल्या होत्या, साहेब बत्तीस हजार मतांनी आघाडीवर आहेत, असे कळाले. अरूंधतींच्या आर्इंनी आपल्या लाडक्या लेकीला आनंदाने जवळ घेतले.

Web Title: Arundhati's valuable contribution in the victory of Munna