अरुणकुमार डोंगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:38+5:302020-12-13T04:39:38+5:30
आमजाई व्हरवडे (सुनिल चौगले) : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व संचालक अरुणकुमार डोंगळे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते पक्षात ...

अरुणकुमार डोंगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश ?
आमजाई व्हरवडे (सुनिल चौगले) : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व संचालक अरुणकुमार डोंगळे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज, रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील या नेत्यांच्या उपस्थितीत दुर्गमानवाड रक्तदान शिबिर व स्नेहभोजन कार्यक्रम होत असल्याने प्रवेशावर शिक्कामोर्तबच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘गोकुळ’च्या माध्यमातून अरुणकुमार डोंगळे यांनी राधानगरी तालुक्यात आपला वेगळा गट उभा केला आहे. हा गट उभा करत असताना काँग्रेस पक्षाचे काम करत पक्षाला उभारी देण्याचे काम केले. ‘गोकुळ’च्या माध्यमातून मानणारा मोठा गट तालुक्यात आहे. डोंगळे यांनी मागील वर्षी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांची घोर निराशा झाली होती. त्यांनी ज्यांना मदत केली ते या निवडणुकीत त्यांच्याबरोबर दिसलेच नाहीत. त्यामुळे अरुण डोंगळे हे गेले वर्षभर नाराज दिसत होते.
गेल्या आठ दिवसांपासून अरुण डोंगळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दुर्गमानवाड येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होत असल्याने डोंगळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत .
मी सध्या काँग्रेसमध्येच असून शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील. व के. पी. पाटील यांना निमंत्रित केले आहे, पण राष्ट्रवादीत जाण्याचा विषय नाही. माझा मुलगा अभिषेक हा त्याच्या पुढील राजकारणासाठी वेगळा काय निर्णय घेत असेल तर वडील म्हणून त्याला नक्कीच पाठिंबा असेल.
अरुणकुमार डोंगळे
अरुण डोंगळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे आपल्याला माहीत नसून आमचे नेते हसन मुश्रीफ हे डोंगळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असल्याने कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचे आहे. पक्ष प्रवेशाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो.
- ए. वाय. पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी