कोल्हापूरच्या कलावंतांकडून चित्रपटसृष्टीचे सारथ्य : राजदत्त -- गतवैभवासाठी नव्या पिढीने जोमाने कार्यरत व्हावे,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:10 IST2017-12-16T00:08:37+5:302017-12-16T00:10:02+5:30
कोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली भारतीय चित्रपटसृष्टी बाल्यावस्थेत होती. त्या काळात आनंदराव आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटसृष्टीला सामाजिक आणि विधायक दिशा देण्याचे काम केले

कोल्हापूरच्या कलावंतांकडून चित्रपटसृष्टीचे सारथ्य : राजदत्त -- गतवैभवासाठी नव्या पिढीने जोमाने कार्यरत व्हावे,
कोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली भारतीय चित्रपटसृष्टी बाल्यावस्थेत होती. त्या काळात आनंदराव आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटसृष्टीला सामाजिक आणि विधायक दिशा देण्याचे काम केले. त्यानंतर कित्येक वर्षे या क्षेत्राचे सारथ्य कोल्हापूरच्या कलावंतांनी केले. आता हे गतवैभव मिळविण्यासाठी नव्या पिढीने पुन्हा जोमाने कार्यरत व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी शुक्रवारी केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत झालेल्या ‘माय मराठी’ विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह बाळा जाधव उपस्थित होते.
राजदत्त म्हणाले, मने उल्हासित करण्यासाठी कलेचा जन्म झाला.
मनोरंजनातून प्रबोधनाची वाट धरत या कलेने विस्तार केला. भारतीय चित्रपटाचे आद्यमहर्षी म्हणून बाबूराव पेंटरांचे नाव घ्यावे लागते. त्यांनी रसिकांना केवळ चित्र, शिल्प, चित्रपटच नाही दिले तर त्यातून संदेश देण्याचे काम केले. समाजातील घटना रसिकांपर्यंतच पोहोचविताना त्यांचे सामाजिक भान जागृत केले. पाचशे वर्षांपूर्वी साधू-संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले; पण चित्रपटसृष्टीला बाबूराव पेंटरांनी दिशा दिली.
दरम्यान, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिवसभरात टॉकिंग विथ द विंड (श्रीलंका) , पर्सन शॉपर (युएसए), पॅन फ्लोवज २८ (रशिया), सर्वनाम - मराठी, द हाऊस आॅफ द ४१ स्ट्रीट (इराण), झाशांद फरांद (इराणी), किफ्फ शॉर्ट फिल्म, लव इज आॅल यु निड (डेन्मार्क), इंबरन्स आॅफ सरपेंट (कोलंबिया), कलियुग भारतीय, आॅन द पिसफुल पिक (व्हिएतनाम), द प्रोफेसी (व्हिएतनाम), मास्ट्रो (फे्रंच), वास्तुपुरुष हे चित्रपट प्रदर्शित
झाले.
कलामहर्षींच्या कार्याचे समग्र दालन
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची सुरुवात केली या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त फेस्टिव्हलअंतर्गत मांडलेल्या छायाचित्र प्रदर्शनात पेंटर यांनी निर्माण केलेल्या ‘सैरंध्री’ चित्रपटापासूनचा प्रवास मांडला आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचे तंत्र, कलाकारांच्या वेशभूषा, नेपथ्य, प्रसंग यांची कृष्णधवल छायाचित्र पाहताना आपसूकच कुतूहल वाटते.
१ं्नंि३३ं