आरोग्य पर्यवेक्षकास लाच घेताना अटक
By Admin | Updated: December 5, 2014 00:37 IST2014-12-05T00:35:30+5:302014-12-05T00:37:15+5:30
जिल्हा परिषदेत कारवाई : नाहरकत प्रमाणपत्रासाठी मागितली रक्कम

आरोग्य पर्यवेक्षकास लाच घेताना अटक
सांगली : आरोग्य विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी चार हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षकास रंगेहात पकडण्यात आले. आयुब उमर शेख (वय ५४, रा. बोलवाड, टाकळी, ता. मिरज) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेत आज, गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.
तक्रारदार हे ग्रामीण भागात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्लॉट खरेदी केला आहे. तिथे त्यांनी घराच्या बांधकामाचे नियोजन केले. त्यांना हा प्लॉट एन.ए. (अकृषिक) करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा ना-हरकत दाखला पाहिजे होता. यासाठी त्यांनी या विभागाकडे अर्ज केला.
प्रमाणपत्र देण्याचे काम शेख याच्याकडे असते. त्याने दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. रक्कम दिल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही, असे त्याने सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
या विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार तक्रारदाराने शेख यांना आज, गुरुवारी दुपारी लाच देण्याचे मान्य केले होते. तत्पूर्वी लाचलुचपत पथकाने सापळा लावला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून चार हजाराची लाच घेताना शेखला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ माजली. याबाबत विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखला शुक्रवार न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
संपर्क साधा : आफळे
लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे म्हणाले, कोणत्याही शासकीय अधिकारी व अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. संबंधितावर कारवाई केली जाईल.