तोतया पोलिसासह सराफाला अटक
By Admin | Updated: June 12, 2016 01:34 IST2016-06-12T01:34:19+5:302016-06-12T01:34:19+5:30
अनेकांची लूटमार : मोटारसायकलसह दोन लाखांचा ऐवज जप्त

तोतया पोलिसासह सराफाला अटक
कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून निर्जनस्थळी बसलेल्या प्रेमीयुगुलांना लुटणाऱ्या तोतया पोलिसास राजाराम तलाव परिसरात थरारक पाठलाग करून शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी
पकडले. संशयित आरोपी कविराज हेमंत नाईक (वय ३०, रा. नारायणी बंगला, साळोखेनगर, देवकर पाणंद) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने घेतल्याप्रकरणी सराफ मयूर मदन पोतदार (२८, रा. देशपांडे गल्ली, खरी कॉर्नर) यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, सोन्याचे दागिने, वेताची काठी, शिट्टी, महाराष्ट्र पोलिस असे किचेन असा सुमारे दोन लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत अधिक माहिती अशी, महाविद्यालयीन प्रेमीयुगुल कारमधून शिवाजी विद्यापीठाकडून मॅगडोनाल्डकडे जात असताना राजाराम तलाव येथे पाठीमागून पॅशन-प्रो मोटारसायकल (एमएच ०९, २११२) वरून काळ्या रंगाची सफारी घातलेल्या चालकाने शिट्टी मारून कार अडविली. यावेळी आपण विश्वास लोखंडे नावाचा पोलिस आहे. तुमचे ओळखपत्र दाखवा, तुम्ही कुठे निघाला, पोलिस स्टेशनला नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल करतो आणि वृत्तपत्रांत बातमी देतो, अशी भीती दाखवत त्यांना बाजूला घेतले.
यावेळी तरुण-तरुणीच्या अंगावरील एक तोळ्याची चेन व अंगठी जबरदस्तीने काढून घेत तो माघारी निघून गेला. संबंधित तरुणाने याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख
यांची भेट घेऊन फिर्याद दिली.
सापळा लावून अटक
तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार पोलिस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, गौरव चौगले, सागर साळोखे यांनी शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणाला सोबत घेऊन राजाराम तलाव परिसरात सापळा लावला. याठिकाणी मोटारसायकलवरून सफारी घातलेली एक व्यक्ती त्यांच्या नजरेस पडली. त्याच्या मागोमाग ते जाऊ लागले. तो विद्यापीठातून सरनोबतवाडी नाक्यापासून थेट राजाराम तलावाच्या दिशेने येत असताना त्याला कार नजरेस पडताच तो जवळ आला. यावेळी तरुणाने त्याच्याकडे बोट करून हाच तो असे म्हणताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप टाकली असता तो हिसडा मारून पळून जाऊ लागला. यावेळी थरारक पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.
१४ जोडप्यांची लूटमार
नाईक याने दीड वर्षात राजाराम तलाव, विद्यापीठ परिसर, उजळाईवाडी विमानतळ रोड, चित्रनगरी, शेंडा पार्क, भारती विद्यापीठ परिसर, आर. के.नगर, कात्यायनी, पन्हाळा, जोतिबा, आदी ठिकाणची निर्जन स्थळे व हॉटेल व लॉजवरील १४ प्रेमीयुगुल जोडप्यांकडून पैसे व सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली आहे.
श्वान प्रशिक्षक ते तोतया पोलिस
कविराज नाईक हा श्वान प्रशिक्षक आहे. त्याने दिल्लीहून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे सात कुत्री आणली होती. ती तिसऱ्या दिवशी आजाराने मृत झाली. त्यामुळे तो दिल्ली, मुंबई येथे खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करण्यास गेला. २०१३ मध्ये नोकरी सोडून तो कोल्हापूरला परतला. शरीरयष्टी चांगली असल्याने तो पोलिस असल्याचे मित्रांना व शेजारील लोकांना सांगत असे. त्याला पोलिसांच्या कारवाईची थोडीफार माहिती होती. पॅशन-प्रो गाडीवर त्याने ‘पोलिस’ लिहिले. गाडीच्या चावीला ‘महाराष्ट्र पोलिस’ किचेन व शिट्टी लावली. वेताची काठी गाडीला अडकवून घरी पत्नी व आईला सुरक्षा गार्ड म्हणून नोकरीस जात असल्याचे सांगून रोज दुपारी तो बाहेर पडत असे. निर्जनस्थळी जाऊन प्रेमीयुगुलांना पोलिसाची भीती दाखवून लूटमार करीत असे.(प्रतिनिधी)