राधानगरीतील विस्तार अधिकाऱ्यास अटक
By Admin | Updated: April 17, 2016 00:51 IST2016-04-17T00:51:51+5:302016-04-17T00:51:51+5:30
सांगलीतील पेपरफुटी प्रकरण : संजय कांबळेच्या हरिपूर येथील घरावर छापा

राधानगरीतील विस्तार अधिकाऱ्यास अटक
सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पदाच्या पेपरफुटीप्रकरणी शनिवारी रात्री सांगली पोलिसांनी राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी अभिजित आनंदराव पाटील (वय २८, रा. राधानगरी) यास अटक केली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संजय कांबळे याच्या हरिपूर (ता. मिरज) येथील घरावर छापा टाकून झडती घेतली.
सहा महिन्यांपूर्वी पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. गेल्या आठवड्यात कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक संजय कांबळे (रा. हरिपूर) व राधानगरी पंचायत समितीतील कंत्राटी डाटा आॅपरेटर विकास फराकटे (रा. फराकटेवाडी, ता. राधानगरी) यांच्यासह चौघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अभिजित पाटील याचे नाव निष्पन्न झाले होते. पाटील हा अटकेतील फराकटेचा मावसभाऊ आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील एका कर्मचाऱ्याने हा पेपर फोडून प्रथम फराकटेला दिला होता. फराकटेने पुढे हा पेपर पाटीलला दिला होता. त्यानंतर त्याने उमेदवारांना संपर्क साधून हा पेपर पुरविल्याचे निष्पन्न झाले. पाटीलच्या शोधासाठी सांगली पोलिसांनी शुक्रवारी राधानगरीला येथील त्याच्या घरावर छापा टाकला असता तो सापडला नाही. शनिवारी त्यास अटक केले. त्याला घेऊन रात्री उशिरा पथक सांगलीत दाखल झाले. त्याला उद्या (रविवारी) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)