लहान मुलांवरील उपचारासाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:56+5:302021-05-11T04:24:56+5:30
कोल्हापूर : सध्याच्या वाढत्या काेरोना संसर्गाची लाट लहान मुलांपर्यंतदेखील पोहोचत आहे. त्यांच्यावरील उपचारासाठीही व्हेंटिलेटरची व्यवस्था तयार ठेवा अशा सूचना ...

लहान मुलांवरील उपचारासाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था ठेवा
कोल्हापूर : सध्याच्या वाढत्या काेरोना संसर्गाची लाट लहान मुलांपर्यंतदेखील पोहोचत आहे. त्यांच्यावरील उपचारासाठीही व्हेंटिलेटरची व्यवस्था तयार ठेवा अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिल्या. रुग्णाच्या आरटीपीसीआर रिपोर्टची वाट न पाहता आधी त्याच्यावर उपचार सुरू करावेत. नागरिकांनीही लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले.
कोरोना उपाययोजना आणि लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
जिल्ह्यातील मृत्यूदर कसा रोखता येईल, याबाबत ते म्हणाले, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते-ते करा. सध्याच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा, औषधे, रेमडेसिविर आणि ॲंटिजन किट याची व्यवस्था केली जाईल.
यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, नोडल अधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनाही टास्कफोर्स पाठविण्याची सूचना करून जिल्ह्याला १० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले. ग्रामीण स्तरावर आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी संगणकीय सादरीकरण केले. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आयुक्त डॉ. बलकवडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही सद्यपरिस्थितीचा आढावा दिला.
फोटो नं १००५२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.