सेनेचा षट्कार; काँग्रेस भुईसपाट
By Admin | Updated: October 20, 2014 00:59 IST2014-10-20T00:55:29+5:302014-10-20T00:59:09+5:30
अमल महाडिक, क्षीरसागर, नरके विजयी : सतेज, कोरे, सा. रे., आवाडे, के. पी. यांचा पराभव

सेनेचा षट्कार; काँग्रेस भुईसपाट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी तब्बल सहा जागा जिंकून शिवसेनेने दणदणीत विजय मिळविला. भाजपला दोन जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचा राधानगरीत दारुण पराभव झाला तरी कागल व चंदगडची जागा या पक्षाने राखली. काँग्रेसला मात्र एकही जागा राखता आली नाही. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षासही जनतेने भिरकावून दिले.
अत्यंत चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवून सतेज पाटील यांना चारीमुंड्या चीत केले. अत्यंत कमी कालावधी असतानाही बड्या नेत्याचा पराभव करून अमल ‘जाएंट किलर’ ठरले. अशीच लढत कागलमध्ये झाली. जातीयवादी प्रचाराचा भडिमार होऊनही तिथे प्रचंड कामे व लोकसंपर्काच्या बळावर माजी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे यांचा पराभव करून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही चपराक दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या सभेचा प्रभाव झाल्यामुळेच भाजपच्या पाचपैकी दोन जागा विजयी झाल्या. याउलट सोनिया गांधी यांची सभा मात्र काँग्रेसचा एकही आमदार करू शकली नाही. मावळत्या सभागृहात काँग्रेसचे दोन आमदार होते. या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सा. रे. पाटील, पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमू पाटील यांचा धुव्वा उडाला.
कोल्हापूर उत्तरमधून अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जागा राखली. करवीर मतदारसंघात अखेरपर्यंत चुरस झाली; परंतु शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना अवघ्या ७१० मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. राधानगरीत राष्ट्रवादीचे आमदार के. पी. पाटील यांचा शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी दणदणीत पराभव केला. तिथे ‘के. पी. नको’ या लाटेचा फायदा आबिटकर यांना झाला. कागलमध्ये सदाशिवराव मंडलिक, संजय घाटगे गट व शिवसेना एकत्र असूनही मतदारसंघावरील पकड, कामांचा डोंगर व उत्तम व्यक्तिगत लोकसंपर्क या त्रिसूत्रीच्या बळावर मुश्रीफ विजयी झाले. चंदगडला राष्ट्रवादीच्याच आमदार संध्यादेवी कुपेकर यांना लोकांनी पुन्हा संधी दिली.
शाहूवाडीत पोस्टल मतांपर्यंत रंगलेल्या लढतीत अवघ्या ३९८ मतांनी शिवसेनेचे सत्यजित पाटील यांनी विजय मिळविला. त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांचा पराभव केला व त्यांना जमिनीवर आणले. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्याच डॉ. सुजित मिणचेकर यांनी ‘कुणालाही उपद्रव न देणारा माणूस’ या प्रतिमेच्या बळावर काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा पराभव केला. शिरोळमध्ये स्वाभिमानी संघटनेला धडा शिकवायचा म्हणून लॉबी सक्रिय
होती. तिला जातीय आधार मिळाला. मराठा विरुद्ध अन्य अशी विभागणी होऊन शिवसेनेचे उल्हास पाटील विजयी झाले. तिथे स्वाभिमानीचे सावकर मादनाईक तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
खासदार शेट्टी यांचा होमग्राउंडवर झालेला हा सगळ्यांत दारुण
पराभव आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार डॉ. सा. रे. पाटील हे चौथ्या स्थानावर फेकले गेले. इचलकरंजीत काँग्रेसच्या प्रकाश आवाडे यांचा भाजपच्या सुरेश हाळवणकर यांनी दणदणीत पराभव केला.
प्रस्थापितांना लाथाडले...
जिल्ह्याच्या राजकारणातील प्रस्थापित नेत्यांना जनतेने लाथाडल्याचे निकालावरून स्पष्ट दिसते.
त्यामध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विनय कोरे, माजी खासदार जयवंतराव आवळे, सा. रे. पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, आदींचा समावेश आहे.
विजयी उमेदवार व मताधिक्य
कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर - २२,४२१ (शिवसेना)
करवीर : चंद्रदीप नरके - ७१० (शिवसेना)
राधानगरी : प्रकाश आबिटकर - ३९,४०८ (शिवसेना)
हातकणंगले : डॉ. सुजित मिणचेकर - २९,३७० (शिवसेना)
शिरोळ : उल्हास पाटील - २०,०३३ (शिवसेना)
शाहूवाडी : सत्यजित पाटील - ३८८ (शिवसेना)
कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक - ८,५९७ (भाजप)
इचलकरंजी : सुरेश हाळवणकर - १५,२२५ (भाजप)
कागल : हसन मुश्रीफ - ५,९३४ (राष्ट्रवादी)
चंदगड : संध्यादेवी कुपेकर - ८,१९९ (राष्ट्रवादी)