कागल तालुक्यात आधार कार्डसाठी मनमानी
By Admin | Updated: February 19, 2015 23:37 IST2015-02-19T23:34:01+5:302015-02-19T23:37:23+5:30
तीनच केंदे्र : एका केंद्रावर मनमानी पद्धतीने लोकांच्याकडून पैसे

कागल तालुक्यात आधार कार्डसाठी मनमानी
जहाँगीर शेख - कागल -रेशनकार्डावरील धान्याच्या बदल्यात रोख स्वरूपात बँकेत अनुदान जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड हवे, असे रेशन धान्य दुकानदारांनी सांगितल्यापासून कागल तालुक्यात आधार कार्डापासून वंचित असलेल्या लोकांची धांदल उडाली आहे; पण आधार कार्ड काढून देणारी तीनच केंद्रे कागल तालुक्यात असल्याने तेथे गर्दी होत आहे. त्यातच एका केंद्रावर मनमानी पद्धतीने लोकांच्याकडून पैसे घेतले जात आहेत. तहसील कार्यालयाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कागल तालुक्यातील नोकरी, कामधंदा यानिमित्त बाहेरगावी राहिलेले लोक तसेच गोरगरीब, शेतमजूर, अशिक्षित लोकांचा बँकेच्या व्यवहाराशी फारसा संपर्क आला नसल्याने त्यांना आधार कार्डाचीही गरज भासली नव्हती. मात्र, आता रेशन धान्य दुकानदाराने धान्य देण्याचे बंद करून आधार कार्ड हजर करा, असे म्हटल्यावर कामधंदा सोडून हे लोक आधार कार्ड काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रावर सहकुंटुब हजर होत आहेत. तालुक्यात मुरगूड, चिखली, कागल येथील तीन महा-ई-सेवा केंद्रांवर ही सुविधा सुरू आहे. दिवसभर येथे गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत एका केंद्रावर मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात आहेत. तालुक्यात तीनच ठिकाणी ही केंद्रे आणि ती पण एकमेकांपासून दूर अंतरावर असल्याने लोक हतबल झाले आहेत. यापूर्वीही या एका महा-ई-केंद्राबद्दल तहसील कार्यालयाकडे तक्रारी झाल्या आहेत. आधार कार्ड आणि तहसील कार्यालयाचा फारसा संबंध नाही. मात्र, महा-ई-सेवा केंद्रे या कार्यालयाच्याच नियंत्रणाखाली काम करतात.
महा-ई-सेवा केंद्रांनाही अनुदान नाही
वर्षभरापूर्वी आधार कार्ड काढून देण्यासाठी सेवा केंद्रांची नियुक्ती झाली. एका आधार कार्डामागे दहा रुपयांच्या दरम्यान खर्चापोटी अनुदान घेऊन हे काम ही केंद्रे करीत आहेत. मात्र, एक-दोन केंद्रांच्या अशा वागणुकीमुळे सर्वांनाच त्रास होत आहे.