महाराजाच्या भोंदूगिरीला चाप

By Admin | Updated: April 10, 2016 00:56 IST2016-04-10T00:56:13+5:302016-04-10T00:56:13+5:30

दत्त मंदिरातील प्रकार : कार्यकर्त्यांनी दिली समज; अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा

Archbishop of Maharaja's Bhonaduagiri | महाराजाच्या भोंदूगिरीला चाप

महाराजाच्या भोंदूगिरीला चाप

कोल्हापूर : मिरजकर तिकटीजवळील पुरातन एकमुखी दत्त मंदिरातील एका महाराजाच्या भोंदूगिरीला शनिवारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चाप लावला. मंदिरात धार्मिक विधी शिवाय अन्य कोणतीही भोंदूगिरी खपवून घेणार नाही, असा इशारा महाराजास देण्यात आला. दत्त मूर्तीच्या आडवे येणारे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी तराटणीही त्यास देण्यात आली.
मिरजकर तिकटी परिसरात विठ्ठल मंदिराकडे जाताना डाव्या बाजूस एकमुखी दत्त मंदिर असून, श्री एकमुखी दत्त आखाडा ट्रस्टचे या मंदिरावर नियंत्रण आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संतोष गोसावी
नावाच्या महाराजाने या मंदिरात प्रवेश करतेवेळी प्रवेद्वारासमोर लोखंडी जाळीची मोठी केबीन तयार केली आहे. भाविकांना आत मंदिरात जाताना वळून जावे लागते. केबीनमध्ये महाराजाने त्याची बैठकीची सोय केली असून, त्या ठिकाणी धुनीसमोर बसून भाविकांना त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचे, भविष्य सांगण्याचे काम सुुरू केले होते. याबाबत काही भाविकांमध्ये नाराजी होती. प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी हा त्याचा उद्योग चालत होता.
शनिवारी सायंकाळी हिंदू एकता कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक होती. काही नागरिकांनी तेथे येऊन मंदिरातील प्रकाराची माहिती सांगितली. त्यावेळी निवासराव साळोखे, बाबा पार्टे, संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, श्रीकांत भोसले, शिवाजीराव ससे, दीपा पाटील, रूपाली पाटील, चारूलता चव्हाण, आदींनी मंदिरात जाऊन संतोष गोसावी याची झाडाझडती घेतली. कार्यकर्ते आत गेले त्यावेळी तो भाविक जोडप्यास भविष्य सांगत होता. निवास साळोखे यांनी त्याला समज देताना मंदिरात पूजाअर्चा, धार्मिक विधी करण्यास आमची हरकत नाही; परंतु दत्ताच्या नावावर भविष्य सांगण्याचा उद्योग करायचा नाही, असे बजावले. गोसावी याने भविष्य सांगण्याचा नवीन उद्योग सुरू केला असून, त्याबाबत तक्रारी होत्या. भाविकांची अशा प्रकारे फसवणूक होणे योग्य नाही, म्हणून संबंधिताला सूचना दिली आहे. हा प्रकार थांबला नाही, तर आम्ही स्वत: अतिक्रमण काढून टाकू, असे साळोखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Archbishop of Maharaja's Bhonaduagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.