ठेकेदाराची मनमानी पद्धतीने रस्ता खाेदाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:40+5:302021-02-05T07:00:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यात सुरु असलेल्या महानेट प्रकल्पाच्या खाेदाईमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नवीन केलेल्या ...

ठेकेदाराची मनमानी पद्धतीने रस्ता खाेदाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यात सुरु असलेल्या महानेट प्रकल्पाच्या खाेदाईमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नवीन केलेल्या रस्तेही खोदल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकल्पाच्या ठेकेदाराने मनमानी कारभार करत संपूर्ण रस्ते, गावातील अंतर्गत रस्तेही खोदल्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. महानेटच्या ठेकेदाराने सर्व नियम धाब्यांवर बसवले असून, खोदलेले रस्ते दुरुस्त कोण करणार, असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
शाहूवाडी तालुक्यात गेले वर्षभर केंद्र शासनाच्या महानेट प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. इंटरनेटने सर्व ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. भविष्यात सर्व शासकीय, खासगी यंत्रणा डिजिटल होणार आहेत. ही योजना चांगली आहे, मात्र महानेट प्रकल्पाच्या ठेकेदाराने ग्रामस्थांना विश्वासात न घेता गावागावात मनमानी खोदाई केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नवीन रस्त्यांचीही खोदाई केली आहे. रस्त्याच्या मध्य भागापासून पंधरा मीटरच्या बाहेर खोदाई करावयाची आहे. मात्र, ठेकेदाराने रस्त्याकडेला खोदाई करून केबल टाकली आहे. नांदगाव, खोतवाडी, घुंगुर, कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग, मलकापूर - अणुस्कुरा, करंजपेण, येळवडी, शाहुवाडी आदी रस्ते खोदून ठेवले आहेत. वन विभागाच्या हद्दीतही खोदाई केली आहे. वन विभागाने याला परवानगी दिली कशी, याचे गौडबंगाल काय? एकीकडे रस्त्याला परवानगी नाकारणाऱ्या वन विभागाच्या हद्दीत खोदाई कशी केली जाते, असा प्रश्न विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महानेट कंपनीच्या ठेकेदाराकडून रस्त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई घ्यावी.
१. मनमानीपणे महानेट कंपनीच्या ठेकेदाराने केलेल्या खोदाईची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहे.
- दत्ता पोवार
तालुकाप्रमुख, शिवसेना, शाहुवाडी
फोटो शाहुवाडी तालुक्यात महानेट कंपनीच्या ठेकेदाराने रस्त्याकडेला खोदाई केली आहे.