पहिल्या दिवशी नेले सुमारे १७५ अर्ज
By Admin | Updated: September 21, 2014 00:54 IST2014-09-21T00:54:50+5:302014-09-21T00:54:50+5:30
विधानसभा निवडणूक; एकही अर्ज दाखल नाही

पहिल्या दिवशी नेले सुमारे १७५ अर्ज
कोल्हापूर : पितृपक्षामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज, शनिवारी जिल्ह्यात कुणी फिरकले नसले तरी कोरे अर्ज नेण्यासाठी मात्र इच्छुक उमेदवारांनी तत्परता दाखविली. प्रत्येक मतदारसंघातून सरासरी वीसहून जास्त कोरे अर्ज नेण्यात आले. त्यामुळे दहा मतदारसंघांतून सुमारे १७५ कोरे अर्ज आज, शनिवारी पहिल्याच दिवशी नेण्यात आले. त्यावरून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची भाऊगर्दी उसळणार, हेदेखील स्पष्ट झाले.
उमेदवारांची भुमिका काहीही असली तरी शासकीय निवडणुक यंत्रणा मात्र कार्यरत झाली आहे. निवडणुक कामासाठी सतरा हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसह प्रशिक्षणाचे दिवसही निश्चित करण्यात आले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीची अधिसुचना आज जाहीर झाली आणि आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेससुध्दा सुरवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदार संघ असून पहिल्या दिवशी सर्वच मतदार संघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काही उमेदवारांचे प्रतिनिधी कार्यालयात जाऊन चौकशी करताना तसेच अन्य कागदपत्रांची जमवाजमव करताना दिसत होते.
सध्या पितृपंधरावडा सुरु आहे. या पंधरावड्यात कोणतेही शुभ काम करण्याचे टाळले जाते. त्यामुळेच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे पुढे ढकलले आहे. घटस्थापना झाल्यानंतरच (२५ सप्टेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होईल अशी शक्यता आहे.
जिल्हाधिकारी राजाराम माने, अतिरीक्त जिल्हाधिकारी अजीत पवार, पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आज सायंकाळी निवडणुक आयोगाच्या शिरस्त्याप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन निवडणुक तयारीसंबंधी माहिती दिली. जिल्ह्णात निवडणुक प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयातील १७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती क रण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना दि.२१ व दि.२८ रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी ८५ टक्क्यापर्यंत वाढावी म्हणून प्रशासनाकडून विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने रॅली, सभा, मेळावे, जाहीराती करण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)