ग्रामसभेत मंजुरी : सांसद आदर्श ग्राम योजना, धनंजय महाडिक यांचे मार्गदर्शन
By Admin | Updated: May 30, 2015 01:02 IST2015-05-30T00:49:07+5:302015-05-30T01:02:57+5:30
--लोकमतचा पाठपुरावा

ग्रामसभेत मंजुरी : सांसद आदर्श ग्राम योजना, धनंजय महाडिक यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर-अडकूर : चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी तयार केलेल्या १६ कोटी ८८ लाख ६७ हजारांचा ग्रामविकास आराखडा गुरुवार (दि. २८) च्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर झाला. खासदार धनंजय महाडिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक यांनी हे गाव ‘सांसद आदर्श ग्राम योजने’तून दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून तयार केलेल्या आराखड्यावर चर्चा करून मंजुरीसाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच वृषाली मुगेरी अध्यक्षस्थानी होत्या.
महाडिक म्हणाले, भौतिक व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६ जानेवारी ते १५ मे अखेर विविध शासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या सहभागाने आराखडा तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. गावातील प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठीही आराखड्यात नियोजन केले आहे. ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हातभार लावावा. आराखड्यातील कामे टप्प्याटप्प्याने होतील. प्रत्यक्ष कामांना लवकरच प्रारंभ होईल.
प्रांताधिकारी कुणाल खेमणार यांनी ‘सांसद आदर्श ग्राम योजने’ची माहिती दिली. आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांचे वाचन झाले.
यावेळी तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, रामराजे कुपेकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील, पाणीपुरवठा विभागाचे एन. बी. भोई, कृषी अधिकारी आर. आय. रूपनर, अधिकारी सुषमा देसाई, वीज वितरण कंपनीचे अधिकारी दीपक कुमठेकर, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आर. जी. इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक विनायक संभाजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
५आराखड्यातील महत्त्वाची कामे
ग्राम सचिवालय, स्मशानशेड, अंतर्गत रस्ते यांच्या ११ कामांसाठी ३ कोटी ५२ लाख ५६ हजार, वृक्षलागवडीच्या चार कामांसाठी ४२ लाख ३८ हजार, उपकेंद्र, पोल बदलणे, वीजजोडणी यांच्या १४ कामांसाठी ४ कोटी ८१ लाख ६४ हजार, नळ पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प, विहिरी खुदाई, वैयक्तिक शौचालय यांच्या ७ कामांसाठी २ कोटी ३८ लाख ७० हजार, प्राथमिक शाळा इमारत, मैदान, स्मार्ट स्कूल, सौरऊर्जेचा वापर, संगणक यांच्या १८ कामांसाठी ३४ लाख ३७ हजार, माध्यमिक शाळा इमारत, मैदान, स्मार्ट स्कूल, इ-लर्निंग यांच्या १० कामांना ४९ लाख ७० हजार, सिमेंट नाला, जलसंधारणाची कामे यासाठी ९७ लाख, मध्यम प्रकल्पासाठी ४० लाख अशी तरतूद केली आहे.