साडेसहा कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By Admin | Updated: July 10, 2014 00:58 IST2014-07-10T00:56:38+5:302014-07-10T00:58:59+5:30

कुरुंदवाड पालिका : विशेष सभेत विविध सहा विषय मंजूर

Approval of budget of Rs | साडेसहा कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

साडेसहा कोटींचे अंदाजपत्रक मंजूर


कुरुंदवाड : शहरातील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर, मल्टीपर्पज सभागृह बांधण्याच्या सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. याशिवाय व्यवसाय परवाना फीमध्ये २५ टक्के कपात, चर्मकार व्यावसायिकांना गाळे देण्याचा ठरावही करण्यात आला. विषयपत्रिकेवरील विविध सहा विषयांच्या मंजुरीसाठी पालिकेची आज, मंगळवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे होते.
विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन एस. एस. बत्ते यांनी केले. २०१४-१५ सालासाठी पालिकेच्या व्यवसाय परवाना फी वाढीबाबत व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने सभागृहातील चर्चेनंतर वाढीव रकमेवर २५ टक्के कपात करण्याचे सर्वानुमते ठरले. शहरातील चर्मकार व्यावसायिक खोकीधारकांना जागा मिळवून देणे व त्यासाठी पाच नगरसेवकांची समिती स्थापण्याचा, नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या कामाच्या मुदतवाढीसाठी आलेल्या अर्जांना मुदतवाढ देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दलित वस्तीतील पाणीपुरवठा योजनेची मुदत संपूनही अद्याप काम अपूर्ण असल्याने व आजच्या सभेत ठेकेदाराकडून मुदतवाढीसाठी अपुऱ्या पद्धतीचे अर्ज केल्याने उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर मुदतवाढीबाबत पुढील सभेत निर्णय घेण्याबरोबरच दलित वस्तीतील पाण्याच्या सोयीसाठी नगरपालिकेने दररोज चार टॅँकर पाणी देण्याचा आग्रह धरला व त्याचा खर्च संबंधित ठेकेदारावर टाकण्याची मागणी केली. त्यामुळे दलित वस्तीला दररोज पाणी देण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष डांगे यांनी दिले.
यावेळी बाबासो भबिरे, धोंडुबाई बागवान, माधुरी सावगावे, विलास उगळे, रजियाबेगम पठाण, कमरुन हुक्कीरे, कृष्णाबाई मधाळे, विमल जोग, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Approval of budget of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.