त्रिसदस्यीय सुकाणू समितीची नियुक्ती
By Admin | Updated: July 31, 2014 23:29 IST2014-07-31T22:10:43+5:302014-07-31T23:29:45+5:30
थेटपाईपलाईनवर वॉच : स्थायी सभापतींच्या अध्यतेखाली पाहणार काम; दर महिन्याला देणार अहवाल

त्रिसदस्यीय सुकाणू समितीची नियुक्ती
कोल्हापूर : सल्लागार कंपनीवर विश्वास ठेवून रस्ते प्रकल्पासारखा घात करून घेण्यापेक्षा थेट पाईपलाईन योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली दोन स्थायी सदस्यांचा समावेश असणाऱ्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती योजनेवर लक्ष ठेवून दर महिन्याला अहवाल देईल, असे स्पष्ट नमूद करून योजनेची निविदा स्थायी समितीने काल, बुधवारी रात्री आयुक्तांकडे पाठविली. आयुक्त उद्या, शुक्रवारी योजना मंजुरीचे पत्र ‘जीकेसी’ या ठेकेदारास देण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडे सक्षम लोक नाहीत. यासाठी प्रत्येक लहान-मोठ्या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी सल्लागार कंपनी नेमली आहे. शहरातील तब्बल ७०० कोटींचे प्रकल्प सल्लागार कंपनीने सक्षमपणे काम न केल्याने रखडले आहेत. महापालिकेतील अधिकारीही सल्लागार कंपनीकडे बोट दाखवून रिकामे होतात. यामुळे थेटपाईपलाईनसह सर्वच मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. मात्र, योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी सुकाणू समिती नको, असा पवित्रा काहींनी घेतला होता. अखेर स्थायी सभापतीसह दोघांचा समावेश असणारी समिती नेमून या योजेनेवर लक्ष ठेवण्यावर तोडगा निघाला.
सल्लागार कंपनीने झाडे, भूसंपादन, मार्गातील बदल, अनुभवाचा दाखला याबाबत संदिग्धता निर्माण करणारा अहवाल दिल्याने यावरून महासभेतही मोठा गदारोळ झाला होता. यापूर्वीच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाईपलाईनसाठी दिलेल्या सर्व उपसूचना मागे घेण्यात आल्या होत्या. मात्र, सुकाणू समितीवरून निर्णय होऊ न शकल्याने निविदा प्रक्रिया रखडली होती. यावेळी योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी महापौर व स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश असलेली सुकाणू समितीची स्थापना करण्याचे ठरले होते. यामध्ये बदल करून फक्त स्थायी समिती सभापतीचा समावेश असलेली समिती नेमण्याचे ठरले.
लवकरच ठेकेदारास मंजुरीचे पत्र दिले जाणार असून, १५ कोटी अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत दिली जाईल. यानंतर ठेकेदारास वर्कआॅर्डर दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
४कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली पाहिजे. मात्र, योजना अत्यंत पारदर्शी व सक्षमपणे पार पाडावी, यासाठी आलेल्या सूचना व
शंकाचे स्वागतही प्रशासनाने केले पाहिजे.
---रस्ते प्रकल्पासारखी फसगत नको, यासाठी योजनेबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. २) सर्व पक्षीय कृती समितीतर्फे बैठकीचे आयोजन केले आहे.
---सायंकाळी ४ वाजता मिरजकर तिकटी येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाबा इंदुलकर व निवास साळोख यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
---कृती समितीने यापूर्वीही
आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व महापौर सुनीता राऊत यांना योजना पारदर्शी व्हावी, यासाठी निवेदन दिले आहे.
---महापौर सुनीता राऊत यांनी सर्व शंकांचे निरसन झाल्याशिवाय ठेकेदारास वर्कआॅर्डर देऊ नका, असा आदेश देऊनही प्रशासन काम सुरू करण्याची घाई करीत आहे, असा आरोप इंदुलकर यांनी केला आहे.
----जनतेची मते जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून, बैठकीत पुढील दिशा व योजनेच्या सर्व पैलूंवर चर्चा केली जाणार आहे.