‘माध्यमिक’च्या कारभाराचे वाभाडे
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:03+5:302016-03-16T08:36:04+5:30
आंदोलनाचा इशारा : ज्योत्स्ना शिंदे कार्यालयात भेटत नसल्याचा शिक्षक संघाचा आरोप

‘माध्यमिक’च्या कारभाराचे वाभाडे
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील गलथान आणि भ्रष्ट कारभाराची चिरफाड जिल्हा माध्यमिक संघातर्फे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे भेटत नाहीत यासह भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही यावेळी संघाचे अध्यक्ष राजू वरक यांनी केले. या कारभाराच्या विरोधात आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर उद्या, गुरुवारपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
वरक म्हणाले, जिल्ह्यात अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित कामांच्या तक्रारी संघाकडे आल्या आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १६ प्रकरणांकडे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवारपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी यांना दिला होता. मात्र, त्यांनी चर्चेतून मार्ग काढू असे पत्र दिले आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे. चर्चेतून मार्ग काढून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू करणार आहे.
काम असलेले शिक्षक, कर्मचारी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात हेलपाटे मारून थकले आहेत. सोमवार, शुक्रवार हे अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना भेटण्याचे हक्काचे दिवस आहेत, परंतु अपवाद वगळता या दिवशीही शिंदे भेटत नाहीत. मॅडम बैठकीला गेल्या आहेत, असे शिपाई सांगतात. प्रत्यक्ष भेट न झाल्याने चंदगड, राधानगरी, आदी लांबच्या तालुक्यांतून आलेल्या शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक प्रकरणांत शिक्षणाधिकारी, न्यायालये यांचे आदेशही संबंधित शिक्षण संस्थाचालक मानत नाहीत, इतके त्या शिक्षण संस्थांचे चालक मुजोर झाले आहेत. पदोन्नती देताना अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. एका शाळेचा प्रशासन अधिकारी तर शिक्षकांना विमा उतरून घेण्याचा सल्ला देत आहे. शिक्षकांना नाडवण्याचे अनेक मार्ग शिक्षण खाते, संस्थाचालकांनी शोधले आहेत. शिक्षणाधिकारी तक्रार असलेल्या शिक्षण संस्थांशी हातमिळवणी करीत असल्याचाही संशय बळावला आहे.
यावेळी विभागीय निमंत्रक बी. डी. पाटील, सचिव अनिल चव्हाण, जयसिंग देवकर, बी. एस. खामकर, सुरेश खोत, नामदेव दुर्गुळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)