लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पूरग्रस्त भागातील पंचनामे शुक्रवारपासून १५ पथकांच्यावतीने सुरू केले आहेत. यामध्ये घरासह व्यवसायाचेही शासन नियमानुसार वेगवेगळे पंचनामे करण्यात येणार आहेत. याबाबतची बैठक पालिकेमध्ये पार पडली.
आठवड्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने नदीकाठावरील घरे पाण्यात बुडाली होती. यावेळी पूरग्रस्त नागरिकांना पालिकेच्यावतीने अनेक छावण्या तयार करून त्यांना स्थलांतरीत केले. पूर ओसरू लागल्याने त्यांच्या घरांचे पंचनामे करण्यासाठी १५ पथके तयार केली आहेत. यामध्ये तलाठी, कर विभागाचे अधिकारी, शिक्षक, तांत्रिक कर्मचारी, अभियंते, नगर विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.
दरम्यान, सुभाष देशपांडे व संजय बागडे या दोन अभियंत्यांची निवड समन्वय म्हणून केली आहे. पंचनामा करताना स्वतंत्र घर, वेगळी शिधापत्रिका, गॅस जोडणी, आदींची तपासणी करून स्वतंत्र कुटुंब म्हणून शासन नियमानुसार मदत देण्यात येणार आहे. ही बैठक अपर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या उपस्थितीत पार पडली.