उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर द्या

By Admin | Updated: December 29, 2014 00:02 IST2014-12-28T22:58:51+5:302014-12-29T00:02:57+5:30

एन. डी. पाटील : पाचरोजी सांगलीत मोर्चा

Apply product based on expenditure | उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर द्या

उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर द्या

सांगली : शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना, चळवळींची दिशा भरकटत चालली असून, साखरेच्या किमतीवर उसाची किंमत ठरविण्याची चढाओढ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसून, ऊस उत्पादकाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. यासाठी ५ जानेवारीस सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली.
ऊसदरप्रश्नी सांगलीतील कामगार भवनात बैठक झाली. यावेळी पाटील म्हणाले, शेतमालात शेतकऱ्याची गुंतवणूक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे अत्यावश्यक आहे. सध्या दरप्रश्नी भांडवलशाही मानसिकता असणारे कारखानदार एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत आहेत. परंतु शेतकरी योग्य दर मिळाला पाहिजे, या मुद्द्यावर एकत्र येत नाहीत, हे दुर्दैव आहे. मागीलवर्षी उसाला जो दर होता, तो देखील यंदा मिळत नाही. भविष्यात साखरेचे भाव कोसळले तर उसाला मिळणाऱ्या दरात घसरण होणार का? हा प्रश्न आहे. साखरेच्या किमती कमी, जास्त करणे हे सरकारच्या हातात असल्याने उसाच्या उत्पादन खर्चावरच उसाची किंमत ठरविली पाहिजे, हा आपला मुद्दा असला पाहिजे.
इंधनामध्ये इथेनॉलचा वापर केवळ १० टक्के जरी केला तरी त्याचा देशाला आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १९०० अथवा २००० रुपये जमा केले आहेत, त्यांनी त्वरित एफआरपीप्रमाणे रक्कम द्यावी, असे आवाहनही केले.
अजित सूर्यवंशी यांनी, कॉँग्रेस आणि भाजप दोन्ही सरकारची शेतकऱ्यांप्रश्नी भूमिका सारखीच असल्याची टीका केली. भविष्यात एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी एकमताने घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जे. पी. लाड, भास्कर चौगुले, शरद पाटील, व्ही. वाय. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिंधी)


पोपटाचा डोळा...
महाभारतात द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी झाडावर एक कृत्रिम पोपट ठेवून प्रत्येकाला त्याचा वेध घेण्यास सांगितले. परंतु केवळ अर्जुनाचेच लक्ष पक्ष्याच्या डोळ्यावर केंद्रित होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे लक्ष उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यावर केंद्रित झाले, तर यश निश्चित मिळेल. कोणाच्या तरी वळचणीला उभे राहिले की अवस्था अवघड होते. त्यांना कोणी घरातही बोलावत नाही आणि कोणी विचारपूसही करीत नाही. चळवळीतल्या काहींनी वळचणीला राहून काय अवस्था होते, याचा चांगलाच अनुभव घेतला आहे, अशी टीका पाटील यांनी खा. राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.

Web Title: Apply product based on expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.