‘केरबा भाऊ’, ‘रामराजे’, बाबा देसाईंनी दाखल केले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:34+5:302021-03-27T04:25:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते केरबा ...

‘केरबा भाऊ’, ‘रामराजे’, बाबा देसाईंनी दाखल केले अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आदी सात जणांनी अकरा उमेदवारी अर्ज दाखल केले, तर ‘हमीदवाडा’ साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, ॲड. सुरेश कुराडे, विष्णुपंत केसरकर, अरुण इंगवले यांनी उमेदवारी अर्ज नेले.
‘गोकुळ’साठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, ७६ जणाांनी २६० अर्ज नेले, तर सात जणांनी १२ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी ६७ जणांनी २२५ अर्ज नेले आहेत. यामध्ये ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील, वसंत नंदनवाडे, बाबासाहेब देवकर, अजित पाटील-परितेकर, सदाशिव चरापले, विशाल गोपाळ पाटील, ॲड. सुरेश कुराडे, वीरेंद्र मंडलिक, बाजीराव सदाशिव पाटील, विष्णुपंत केसरकर, विद्याधर गुरबे, प्रतापसिंह पाटील-कावणेकर, किरणसिंह पाटील, अरुण इंगवले, नंदकुमार ढेंगे, फिरोज खान पाटील, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, मंजूषादेवी रणजितसिंह पाटील, सागर धुंदरे, सतीश पाटील, अभिजित तायशेटे, युवराज पाटील यांच्यासह ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील यांच्या पत्नी अस्मिता पाटील यांनी अर्ज नेले आहेत.
मुरगूडकर जावाजावांनी नेले अर्ज
‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील-मुरगूडकर यांच्या पत्नी मंजूषादेवी पाटील व ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील यांनी शुक्रवारी अर्ज नेले.
‘दक्षिण’मध्ये महिला उमेदवारीचे संकेत
‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी सत्तारूढ गटाला रामराम केल्याने त्यांच्या ठिकाणी कोणाला संधी द्यायची याची चाचपणी सुरू आहे. ‘दक्षिण’मध्ये महिला उमेदवारी देण्याचा विचार सत्तारूढ गटाकडून सुरू असल्याने त्याची तयारी म्हणून महादेवराव महाडिक यांचे समर्थक गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी पत्नी रूपाली, तर प्रतापसिंह पाटील-कावणेकर यांनी पत्नी शुभांगी यांचे अर्ज दाखल केले. या दोघांनीही स्वत:चे अर्जही दाखल केले आहेत.
मंगळवारी झुंबड उडणार
शनिवारीपासून तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) इच्छुकांची झुंबड उडणार आहे. त्यानुसार निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे.
जीवन पाटील यांचा क्रमांक चुकला
जिल्हा परिषदेचे सदस्य जीवन पाटील यांनी अर्ज दाखल केला. मात्र, त्यामध्ये मतदार यादी क्रमांक चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यांना मंगळवारी पुन्हा अर्ज दाखल करण्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी केली.
चौघांचे दोन-दोन अर्ज
शुक्रवारी ७ जणांनी अकरा अर्ज दाखल केले. यामध्ये केरबा भाऊ पाटील, रामराजे कुपेकर, रूपाली तानाजी पाटील, विजय ऊर्फ बाबा देसाई यांनी दोन-दोन अर्ज दाखल केले, तर शुभांगी प्रतापसिंह पाटील, तानाजी पाटील, जीवन पाटील यांनी एकच अर्ज दाखल केला.