अर्ज अपडेट झाले, आता परीक्षेच्या तारखेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:38+5:302021-08-25T04:30:38+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये जाहीर केलेली पोलीस शिपाईपद भरती प्रक्रियेतील अर्ज अपडेट करण्याची अंतिम मुदत रविवारी ...

अर्ज अपडेट झाले, आता परीक्षेच्या तारखेकडे लक्ष
कोल्हापूर : राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये जाहीर केलेली पोलीस शिपाईपद भरती प्रक्रियेतील अर्ज अपडेट करण्याची अंतिम मुदत रविवारी संपली असून, अखेरच्या दिवशीपर्यंत रिक्त ७८ जागांसाठी सुमारे १५,७६७ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये पोलीस बॅण्डमधील रिक्त ३ जागेसाठी तब्बल ६२१७ अर्ज आले, तर उर्वरित पोलीस शिपाईपदाच्या ७५ जागांसाठी ९५५० अर्ज दाखल झाले आहेत. आज अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता लेखी परीक्षेच्या तारखेकडे उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात भाजपचे सरकार असताना ३ सप्टेंबर २०१९ ला कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदावरील पोलीस शिपाई (गट-क) पदाच्या ७८ जागांसाठी महापरीक्षा पोर्टलच्या प्रकल्प व्यवस्थापकांतर्फे राज्यभर अर्ज मागविले होते. त्या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच मूळच्या अर्जात बदल करण्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. या कालावधीत पोलीस बॅण्डमधील रिक्त ३ जागेसाठी तब्बल ६२१७ अर्ज दाखल झाले, तर उर्वरित पोलीस शिपाईपदाच्या ७५ जागांसाठी ९५५० अर्ज असे एकूण १५७६७ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज अपडेटची मुदत संपल्याने आता लेखी परीक्षा कधी? असा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जात आहे. प्रत्येक पोलीस भरती प्रक्रियेवेळी अर्ज दाखल केल्यानंतर शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेतली जात होती; पण चालू भरती प्रक्रियेत अर्ज दाखल झाले; पण प्रथम लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतरच शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यामुळे आता लेखी परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षेची प्रक्रिया खासगी कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे.