मुरलीधर जाधवच्या विरोधात अपील
By Admin | Updated: February 5, 2015 00:28 IST2015-02-05T00:28:44+5:302015-02-05T00:28:57+5:30
क्रिकेट बेटिंग प्रकरण : जाधवच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा चंग

मुरलीधर जाधवच्या विरोधात अपील
कोल्हापूर : दहा दिवसांनी सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट बेटिंगचा धंदा जोमाने सुरू होण्याची दाट शक्यता असल्याने या बेटिंगचा मुुख्य सूत्रधार नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव याचा जामीन रद्द होण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. त्यामुळे जाधव याच्या मुसक्या आवळण्याचा चंग पोलिसांनी बांधल्याचे स्पष्ट होत आहे.
टाकाळा येथील नगरसेवक जाधव यांच्या जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ४०२ मध्ये २३ जानेवारी रोजी राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला असता प्रकाश श्रीचंद जग्याशी व लक्ष्मण सफरमल कटयार (रा. गांधीनगर) हे दोघे आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या चालू क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असताना दिसून आले. मुुख्य सूत्रधार नगरसेवक जाधव याने गुन्ह्याच्या कामी परस्पर न्यायालयात हजर राहून जामीन मिळविला आहे. गुन्ह्यामध्ये आरोपींनी सांकेतिक भाषेचा वापर केला आहे. गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असून बेटिंगचे प्रशिक्षण आरोपी कोणाकडे घेतात, त्यांचे आणखी कोणाकोणाशी लागेबांधे आहेत, बेटिंगकरिता लागणारे भांडवल त्यांनी कोठून उपलब्ध केले, आणखी कोणाचा यामध्ये सहभाग आहे, आदी मुद्द्यांवर आरोपींकडे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या आरोपींना सहजासहजी जामीन झाल्याने गुन्ह्याचा तपास करता येत नाही; तसेच आरोपींवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्याचा गैरफायदा घेऊन ते येत्या दहा दिवसांनी सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान बेटिंगचा धंदा जोमाने सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे या गुह्याच्या मुळापर्यंत जाऊन अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोपींना अटक होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्य सूत्रधार जाधव याचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. मंगळवारी बेटिंगमध्ये सहभागी असलेल्या दोघा व्यक्तींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली.