जुन्या इमारतीच्या जागेवर बनत आहेत अपार्टमेट
By Admin | Updated: August 13, 2014 23:32 IST2014-08-13T23:09:52+5:302014-08-13T23:32:18+5:30
महानगरातील ट्रेंड कोल्हापुरात :शासनाने एफएसआय, टीडीआर सवलत देण्याचे मागणी

जुन्या इमारतीच्या जागेवर बनत आहेत अपार्टमेट
संतोष पाटील - कोल्हापूर==मुंबई महानगरात जुन्या - कमकुवत इमारतींच्या जागी नव्या इमारती बांधण्यासाठी राज्य शासन विविध सवलती देऊन प्रोत्साहन देत आहे. कोल्हापूरातही शहरातील मोक्याच्या व प्रशस्त जागेत असणाऱ्या जुन्या जीर्ण इमारतींमधील रहिवाशांच्या गरजा पूर्ण करत याजागी नव्या आलिशान इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर चटई निर्देशांक (एफएसआय) व हस्तांतरण विकसित हक्काची (टीडीआर) सवलत शासनाने द्यावी, अशी मागणी नागरिक व बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.
मुंबई-ठाणे परिसरातील ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या इमारती कोसळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. जीवित व वित्तहानी वाढल्यानेच राज्य शासनाने मुंबई परिसरातील जुन्या इमारती काढून त्या जागी नव्या इमारती उभारण्यासाठी एफएसआय व टीडीआरसारख्या सवलती शिथिल केल्या. राज्यातील सर्वच मोठ्या शहरात गावठाणमधील जागा दुर्मीळ झाली आहे. सर्व सोयींसुविधा तत्काळ उपलब्ध होत असल्याने व्यवसायासह रहिवासी कारणांसाठी गावठाणमधील जागांना मोठी मागणी आहे.
कोल्हापूर शहरातही अशा जागाच आता उपलब्ध नसल्याने १० ते १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या मोठ्या इमारतींच्या जागी नव्याने टोलेजंग इमारती उभारण्याचा ‘फंडा’ सुरू झाला आहे.
शहरात रस्ते विकास प्रकल्प पूर्ण होताच रिकाम्या जागेसह रहिवासी घरांचे दर दुप्पट-तिप्पट झाले. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घर खरेदी गेली. पुण्या-मुंबईतील ग्राहक तसेच दुहेरी घर घेण्याची क्षमता असणाऱ्या स्थानिक ग्राहकांची संख्याही रोडावल्याने शहरातील बांधकाम व्यवसायास एक प्रकारची मरगळ आली आहे. जुन्या इमारतींच्या जागी नवी इमारत उभारण्याचा नवा पर्याय बांधकाम व्यावसायिकांसमोर आहे. आणखी एक-दोन वर्षे बांधकाम क्षेत्रातील मंदी सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यास पर्याय म्हणूनही बांधकाम व्यावसायिक जुन्या जागी नव्या अपार्टमेंट उभारण्यास उत्सुकता दाखवित आहेत.
जुन्या इमारती या शहराच्या मध्यवर्ती व मुख्य ठिकाणी आहेत. प्रशस्त जागाच शहरात शिल्लक नसल्याने अशा जुन्या इमारती विकसित करून रहिवाशांना त्यांचा योग्य मोबदला देत नव्या इमारती बांधणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. सध्या अशा इमारती विकसित करण्याचे प्रमाण कमी असले, तरी भविष्यात याचा वेग वाढणार आहे. - दिलीप रोकडे, बांधकाम व्यावसायिक
पूर्वी गरजेनुसार घेतलेला फ्लॅट सध्या
कु टुंबासाठी अपुरा पडत आहे.
या पर्यायाने इतर खर्च न करता नवा कोरा, पूर्वीपेक्षा अत्याधुनिक व मोठा फ्लॅट मिळतो.
जुन्या इमारतींच्या जागा निर्वेध असल्याने महापालिकेची परवानगी मिळविणे त्यामानाने सोपे.
वाढीव ‘एफएसआय’ व ‘टीडीआर’चा पर्याय वापरून बांधकाम व्यावसायिकांचा नफा.
शहर आडवे वाढण्यास मर्यादा असल्याने उभे वाढविण्याचा नवा पर्याय.